रक्ताचा तुटवडा आहे, रक्तदान करा! सरकारचं जनतेला आवाहन

मुंबई: राज्यात बुधवारी दिवसभरात तब्बल ३९ हजार ५४४ नवे कोरोना बाधित आढळले. तर मृतांचा आकडासुद्धा लक्षणीयरीत्या वाढला असून दिवसभरात राज्यात तब्बल २२७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३४ टक्के असून मृत्यूदर १.९४ टक्क्यांवर पोहोचलाय. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ८१ लाख २ हजार ९८० वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत २ कोटी ४० लाख ७२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
अशावेळी राज्यासमोर अजून एक आव्हान उभं राहिलंय. मुंबईसह राज्यात पुढील ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा शिल्लक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. तसंच नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
कोरोना काळात राज्यातील रक्तसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. त्यामुळे महत्वाच्या शस्त्रक्रियांवेळी रुग्णांना रक्ताची अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावं. रुग्णालये आणि विविध सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेत रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचं आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. यावेळी कोरोना नियमांचं पालन करण्यात यावं, असंही शिंगणे यांनी म्हटलंय.
रक्ताचा तुटवडा आहे, रक्तदान करा! – राजेश टोपे
काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. “ब्लड बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. आजपासून १०-१५ दिवस पुरेल एवढंच रक्त या बँकेत शिल्लक आहे. सगळ्यांना आवाहन आहे आणि ब्लड बँकेनेही दखल घ्यावी की, मोठ्या संख्येने ब्लड कलेक्शनचं काम करावं परंतु त्यामुळे संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोना असताना रक्तदान करु शकतो याची संपूर्ण माहिती घेऊनच सांगत आहोत. त्यामुळे रक्तदान केल्याने संसर्ग होणार नाही किंवा वीकनेस येणार नाही. रक्ताचा कमी झालेला साठा पुन्हा भरुन काढावा.
रक्तदान सुरु राहिलं पाहिजे. यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा नियम शिथिल करता येणार नाही. फार गर्दी करु नये. परंतु रक्तदान हे सामाजिक भान असलेलं कार्य आहे आणि गरजेची बाब आहे. सध्याची ही मागणी आहे. मोठे कॅम्प न घेता, जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी दहा-दहाच्या ग्रुपमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखून रक्तदान सुरु ठेवावं”, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.