|

…तर सावरकरांना भारतरत्न देण्यास कॉंग्रेसचा पाठींबा

... then Congress support to give Bharat Ratna to Savarkar
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

भारतरत्न देण्यावरून अनेकवेळा वाद झाले आहेत. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधांमध्ये वाद सुरु आहे. भारतरत्नची सुरवात २ जानेवारी १९५४ ला तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी केली होती. भारतरत्न पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो ज्यांनी मानवतेसाठी कुठल्याही  क्षेत्रात अभूतपूर्व अशी कामगिरी केली असेल. सुरवातीला हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नव्हता, परंतु १९५५ नंतर हा पुरस्कार मरणोत्तर देखील दिला जात आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू महासभेचे नेते होते. महाराष्ट्रातील हिंदूत्ववादी संघटना आणि पक्ष सावरकरांना आदर्श मानतात. अनेक हिंदूत्वावादी संघटनांचे कार्यकर्ते सावरकरांना जन्मठेप झालेल्या अंदमान निकोबरमध्ये जाऊन त्यांच्या स्मृतींना उजाळाही देत असतात. सावरकर हे औद्योगीकरणाच्या बाजूचे होते. सावरकरांचे नातू रणजित यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या सावरकरांच्या समर्थक होत्या, असा दावा  केला आहे. असे सगळे मुद्दे असताना सावरकरांना भारतरत्न का दिला जात नाही हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो.

सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा हा मुद्दा तसा जुनाच आहे. २०१८ पासून या मागणीला अधिक जोर आला आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीत  सावरकर यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा लावून धरला होता. निवडणूक घोषणापत्रातही या मागणीचा समावेश करण्यात आला होता. शिवसेनेनेही अनेकदा सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केलेली आहे. विधानसभेत बुधवारी राज्यपाल यांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाला उत्तर देतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.”सावरकरांना भारतरत्न द्या हे पत्रं दोन वेळेला केंद्र सरकारकडे गेलेलं आहे त्यावेळी देवेंद्र  फडणवीस मुख्यमंत्री होते.” भारतरत्न देण्याचा अधिकार हा देशाच्या पंतप्रधानांना आणि केंद्रीय समितीला आहे आणि असं असताना देखील हा पुरस्कार का दिला जात नाही असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लाऊन बसणारे मुख्यमंत्री आम्हाला हिंदुत्त्व शिकवायला निघाले हे मोठं आश्चर्य आहे” असं प्रत्युत्तर दिले. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मात्र उद्धव ठाकरेंनी लिहिलेले पत्रं हे त्यांचं वैयक्तिक पत्रं आहे की महाविकास आघाडीने लिहिलेलं आहे असा सवाल उपस्थित केला.

याबाबत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत भूमिका मांडली. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या वतीने सावरकर यांना भारतरत्न मिळण्यासाठी शिवसेनेने सभागृहात ठराव मांडला तर जनभावना लक्षात घेऊन त्या ठरावाच्या बाजूने कॉंग्रेसची भूमिका राहणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा अशी भूमिका कॉंग्रेसची असल्याचेही पटोले यांनी सांगितले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *