Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचा"कन्नमवारांनी नेहरुंचा शब्द राखला म्हणून विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात सामील झाले…"

“कन्नमवारांनी नेहरुंचा शब्द राखला म्हणून विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात सामील झाले…”

राज्याचं अधिवेशन आता सुरु आहे. गेले दोन दिवस विदर्भ वैधानिक विकास महामंडळचा मुद्दा खूप गाजत आहे. त्यावरच्या नियुक्त्या तातडीने झाल्या पाहिजे या संबंधाने मागणी होताना आपल्याला दिसत आहे. विदर्भ आणि विदर्भातले नेते आणि माणसे यांनी महाराष्ट्रासंबंधी नेहमी सकारात्मक भूमिका बजावली आहे.

१ मे १९६० रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली. अशा प्रकारे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्याचे तमाम मराठी जनतेचे स्वप्न अखेरीस साकार झाले. द्वैभाषिक मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेच स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतरावांनी आणला.

 देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्र राज्याची निर्मिती होईपर्यंत म्हणजे १९४७ ते १९६० या तेरा वर्षात मुंबई राज्याला बाळासाहेब खेर, मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री मिळाले. १९५६ ते १९६० या काळात यशवंतराव चव्हाण हे मुंबई द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. १९६० ला यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले व जीवराज नारायण मेहता हे गुजरातचे पहिले मुख्यमंत्री झाले. तेव्हाचे मुंबई राज्याचे राज्यपाल श्रीप्रकाश हेच महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल झाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात भाऊसाहेब हिरे व मारोती कन्नमवार या दोन नेत्यांनी यशवंतराव चव्हाणांसमोर आव्हाने उभी केली होती. भाऊसाहेबांच्या रूपाने प्रचंड जनाधार असणारा मराठा नेता यशवंतरावांच्या समोर उभा होता. दोघेही कॉंग्रेसचे बडे प्रस्थ.

मुंबई महाराष्ट्रात सामील व्हायला तयार नव्हती. १०७ हुतात्म्यांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्रात आणली. हे सर्वांना ठाऊक आहे. मात्र विदर्भ महाराष्ट्रात सामील होताना विदर्भातील जनता आणि नेते यांचा त्याग यावर पुरेसा प्रकाश पडलेला नाही.

‘विदर्भ हे स्वतंत्र राज्य व्हावे’ ही ज्येष्ठ नेते मारोती कन्नमवार यांची तीव्र मागणी होती. विदर्भातील ५४ आमदारांनी पंतप्रधान नेहरू यांच्याकडे राजीनामे पाठवून ‘आम्हाला वेगळा विदर्भ द्या’ अशी मागणी केली होती. ही सारी चळवळ कन्नमवारांच्या नेतृत्वाखाली सुरु होती.

 १९५७ च्या मुंबई राज्याच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात संयुक्त महाराष्ट्र समितीने कॉंग्रेसचा पराभव केला होता तर गुजरात मध्ये इंदुलाल याज्ञिक यांच्या महागुजरात समितीने कॉंग्रेसच्या जागा कमी केल्या होत्या. यशवंतरावांचे मुख्यमंत्रीपद व कॉंग्रेसची सत्ता टिकायची असेल तर विदर्भातील आमदारांचा पाठींबा महत्वाचा ठरणार होता. त्यांची सारी सूत्र मारोती कन्नमवारांच्या हाती होते.     

सरकार टिकवायचे तर ५४ आमदार निवडून देणाऱ्या विदर्भाला महाराष्ट्रात कायम ठेवणे ही काँग्रेस पक्षाची गरज होती. दादासाहेब कन्नमवार हे त्या आमदारांचे सर्वश्रेष्ठ नेते होते. ते वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते होते. १९५९ मध्ये नागपुरात काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय अधिवेशन यशस्वीरीत्या भरून त्यांनी आपले स्थान महात्म्यही सिद्ध केले होते. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी यशवंतरावांनी पंडित नेहरूंना भरीला घातलं.

पंडित नेहरू नागपूरला आले आणि त्यांनी कन्नमवार यांना विनंती केली की, ‘तुम्ही विदर्भाच्या मागणीचा आग्रह धरणार असाल, तर गुजरात ही आपल्या हातून जाईल आणि महाराष्ट्र ही आपल्या हातून जाईल.’मग कन्नमवार राजी झाले आणि संयुक्त महाराष्ट्रामध्ये विदर्भ सामील झाला. द्विभाषिक मुंबई राज्यात सामील झाली आणि यशवंतराव यांचे मुख्यमंत्रीपद टिकले. विदर्भ राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडून कन्नमवार यांनी एका निष्ठावान पक्ष कार्यकर्त्या सारखे महाराष्ट्रात राहणे मान्य केले.

विदर्भातील लोकांनी तेंव्हा कन्नमावरांवर अशी टीका केली की, ‘फक्त स्वार्थासाठी कन्नमवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी सोडली’. पण हे खरं नव्हतं असे काही राजकीय विचारवंतांचे मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार १९५६ च्या अखेरीस देशात भाषावार प्रांतरचना झाली. विदर्भाचं राज्य द्यायला भाषावार प्रांतरचना आयोगाची तयारी होता. यासाठी आंबेडकर, वल्लभभाई आणि नेहरूही तयार होते. विदर्भाचे राज्य झालं असतं, तर कन्नमवार त्याचे पहिले मुख्यमंत्री झाले असते. आपले मुख्यमंत्री पद सोडून महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये काँग्रेस पक्ष टिकावा म्हणून मारोती कन्नमवार यांनी नेहरुंचा शब्द राखला. आणि यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments