विरार मधील दुर्दैवी घटना

मुंबई : राज्यात रुग्णालयात आग लागण्याच्या घटना सुरूच असून गुरुवारी रात्री विरार मधील विजय वल्लभ रुग्णालयाला भीषण आग लागली. यात १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याची भावना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
याबाबत बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, प्राथमिक स्थरावर पाहिल्यावर ही दुर्घटना असल्याचे कळते. अचानक एसीचां स्फोट झाल्यानंतर केवळ २ ते ३ मिनिटात सर्वत्र धूर पसरला. त्यामुळे रुग्णांना स्वतःचा जीव वाचवायला वेळ कमी मिळाला. दरवाज्या जवळ असणाऱ्या ४ जणांना वाचविण्यात आले आहे.
हा स्फोट कसा झाला याची चौकशी करण्यात येईल असे टोपे यांनी सांगितले. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने रुग्णांना हात लावता येत नाही. ऑक्सिजन आणि फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासगी मालकीचे हे रुग्णालय आहे. एसी मध्ये अचानक स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समजत आहे. यावेळी १७ रुग्णांवर उपचार सुरू होते. या रुग्णालयातील अधिक रुग्ण हे ऑक्सिजनवर होते. रात्री तीनच्या दरम्यान ही आग लागली. त्यावेळी केवळ २ नर्स उपस्थित होत्या असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. सध्या ८० रुग्णांना इतर ठिकाणी शिफ्ट करण्यात आले आहे.
विरारची घटना दुर्दैवी असून ही घटना नेमकी कशामुळे झाली याची चौकशी करण्यात येईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मृताच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत
या घटनेत मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.