जुलै किंवा ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, राजेश टोपे यांनी वर्तविला अंदाज!

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असतानाच आता महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाव्हायरसमुळे त्रस्त असलेल्या महाराष्ट्रासाठी येणारे दिवस आणखी धोकादायक ठरू शकतात. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसर्या लाटेचा अंदाज वर्तविला आहे. तज्ज्ञांचा हवाला देत टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात जुलै किंवा ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, म्हणूनच आम्ही सध्या याला सामोरे जाण्याची तयारी करीत आहोत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कोविड -19 व्यवस्थापन आणि लसीकरणासह विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की कोरोना रूग्णांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन प्लांट उभारण्यावर भर दिला. कोरोनाची तिसरी लाट पाहता ऑक्सिजनची कमतरता सरकार सहन करणार नाही. म्हणून आतापासूनच पुरेशी व्यवस्था करण्यावर भर दिला जात आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात संक्रमणाची अशीच परिस्थिती असेल असे तज्ज्ञ सांगत आहेत. अशा परिस्थितीत जर जुलै किंवा ऑगस्टमध्ये राज्याला कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सामना करावा लागला तर आपली आव्हाने मोठ्या प्रमाणात वाढतील. ते पाहता आम्ही तयारी सुरू केली आहे. विशेषतः आमचे लक्ष ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर आहे.