रशियाकडून मिळणाऱ्या Sputnik V लसीमुळे भारताला होणार मोठी मदत

लसीची पहिली खेप भारतात १ मे रोजी पोहोचणार
नवी दिल्ली : येत्या १ मे पासून भारतात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. अशातच याच दिवशी भारताला नवी रशियन स्पुतनिक ५ (Sputnik V) ही लसही मिळणार आहे. या लसीची पहिली खेप भारतात १ मे रोजी पोहोचणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे (RDIF) प्रमुख किरील दिमित्रीव यांनी ही माहिती दिलीये. मात्र या पहिल्या खेपेत भारतात किती लस आणल्या जाणार आहेत याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. सरकारने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
दिमित्रीव म्हणाले, की पहिली खेप १ मे रोजी भारतात दाखल होईल. त्यांचं असं म्हणणं आहे, की रशियाकडून मिळणाऱ्या या लसीमुळे भारताला कोरोनाविरोधातील लढ्यात मदत मिळेल. RDIF नं पाच मोठ्या भारतीय निर्मात्यांना दरवर्षी ८५ कोटीहून अधिक लसीचे डोस तयार करण्याचा करार केला आहे. भारतात लवकरच या लसीची निर्मिती सुरू होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरुवातील ५ कोटी डोस प्रत्येक महिन्याला बनवले जाण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात यात वाढही करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. अशात आरोग्य सुविधांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या संकटाच्या काळात अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीसह अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. या देशांनी भारताला तात्काळ मदत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, जागतिक आरोग्य संघटनेनंही भारतातील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोबतच मदतीसाठी एक्सपर्ट पाठवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
जगातील पहिल्या कृत्रिम उपग्रहाप्रमाणे रशियाने या लसचे नाव स्पुतनिक 5 ठेवले आहे. ही लस मॉस्कोमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतन म्हणाले की, त्यांच्या मुलीनं या लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. सोबतच या लसीला ५९ देशांमध्ये वापरासाठी परवानगी मिळाली आहे.