“बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून”, जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांना टोला !

मुंबई: कोरोना व्हायरस नियमांचे पालन करत लॉकडाऊन टाळा, मास्क वापरा आणि कोरोना नियंत्रणात ठेवा. अन्यथा लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना दिला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आणि जगभरातील लॉकडाऊनबाबत तिथल्या सरकारने केलेल्या उपाययोजनांची उदाहरणे दिली. यावर देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊन टाळण्याबाबतच्या आवाहनावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी उदाहरण देत म्हटले होते की, ”बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय. पण, २० बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय. पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे. पण, १३ बिलियन युरोचे पॅकेज मार्च २०२० मध्येच जाहीर केले”.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उदाहरणांचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे. आपले केंद्र सरकार काय देणार. अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून”, असा टोलाही आव्हाड यांनी फडणवीस यांना लगावला आहे.
पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे ….आपले केंद्र सरकार काय देणार …अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही … बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून @Dev_Fadnavis https://t.co/QH60dZJHLn
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2021
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजना आणि वास्तव स्थिती याबाबत माहिती दिली. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. यावर टाळेबंदी हा उपाय नाही हे मान्य आहे, पण त्याला पर्याय हवा आहे. दोन दिवसांत विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पर्यायी मार्ग न सापडल्यास लोकांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल,” असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं. त्याचबरोबर परदेशातील केंद्र सरकारांनी केलेल्या मदतीचे दाखलेही दिले.