प्रेक्षकांविना खेळले जाणार उर्वरित टी-२० सामने
अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने वचपा काढत इंग्लंड विरुद्धच्या दुसरा टी-२० सामना जिंकत मालिकेत बरोबर साधली आहे. पदार्पणाच्या सामन्यात ईशान किशन याने अर्धशतक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भारतात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून अनेक राज्यात कोरोनाचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील अखेरचे ३ सामने प्रेक्षकांविना खेळले जाणार आहेत. हे तिन्ही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पार पडणार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव पाहता गुजरात क्रिकेट असोसिएशनने निर्णय घेतला आहे. भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची टी-२० मालिका सुरू आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामने होत असून, दोन सामने झाले आहेत. अखेरचे ३ टी-२० सामने येत्या १६,१८ आणि २० मार्चला नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये प्रेक्षकांविना खेळले जाणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गुजरात असोसिएशनने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिन्ही टी-२० सामने प्रेक्षकांविना खेळवण्याची बीसीसीआयकडे विनंती केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या प्रेक्षकांनी या सामन्यांचे तिकीट काढले आहेत, त्यांचे पैसे परत केले जाणार आहेत. अशी माहिती गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री धनराज नाथवानी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.