रेखा जरेंच्या मुलाचे उपोषण

नगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड होऊन ३ महिने उलटले तरी अद्याप यातील मुख्य आरोपी बाळ बोठेचा काहीही पत्ता लागलेला नाही. त्यामुळेच आता रेखा जरे यांच्या मुलाने उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. रुणाल जरे याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करत, अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे. बाळ बोठेला तातडीने अटक करा अशी मागणी रुणाल जरे याने केली आहे .
बाळ बोठेच्या अडचणीत वाढ
रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे यांच्या अडचणीत वाढ झालीय. बाळ बोठेला पोलिसांनी फरार घोषित केलं आहे. त्यामुळे बाळ बोठे याच्याविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झालाय.
काय होती घटना?
रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने त्यांची हत्या करण्यात आली होती . ३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर ही घटना घडली होती. यावेळी गाडीत बसलेल्या रुणाल याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं. त्याच्याच मदतीने पोलिसांनी तातडीने ५ आरोपींना गजाआड केलं. मात्र, जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली, तेव्हा या हत्याकांडात शहरातील पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला .
न्यायालयात काय घडलं?
२२ फेब्रुवारीला पारनेर न्यायालयात सुनावणी झाली. त्यात बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात स्टैंडिंग वॉरंट काढण्यासाठी पारनेर येथील न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्यावर सुनावणी होऊन पोलिसांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. त्यानुसार आता पुढील प्रक्रियेत बोठे याला फरार घोषित करण्यात येऊ शकते. याची कल्पना आल्याने बोठे याने स्टैंडिंग वॉरंट ऑर्डरच्या विरोधात जिल्हा आणि सत्र न्यायालयात आव्हान देत अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी आतापर्यंत २ वेळेस न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी यावेळी न्यायालयासमोर पोलिसांचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडले. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी हा अर्ज फेटाळून लावला.