ऑक्सिजन वाहतुकीसाठी रेल्वे सज्ज !

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली होती. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रातील परिस्थिती विषयी माहिती देतांना आरोग्यमंत्री आरोग्यमंत्री टोपे यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली.
महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेता अन्य राज्यांतून महाराष्ट्राकडे ऑक्सिजन घेऊन जाणारी वाहने अडवली जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याविषयी केंद्रीय गृहसचिवांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. रस्तेमार्गे ऑक्सिजन वाहतुकीचा कालावधी वाढत असल्याने रेल्वेच्या माध्यमातून त्याची वाहतुक करण्यात यावी यासाठी केंद्र शासनाने रेल्वे विभागाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वेने याला मान्यता दिली आहे. भारतीय रेल्वेकडून आता खास ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संकटात गंभीर वैद्यकीय परिस्थितीत उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. यासाठी रेल्वेमार्फत महत्वाच्या मार्गांवर द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू अर्थात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकर्स रेल्वेने नेता येऊ शकतील का याची चाचणी करण्यासाठी भारतीय रेल्वेसोबत संपर्क साधला होता. वाहतुकीच्या संदर्भातील चाचणी सुनिश्चित करण्यासाठी विविध चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राकडून टँकर्सचा पुरवठा केला जाणार आहे. हे रिकामे टँकर मुंबई आणि आसपास असलेल्या कळंबोली / बोईसर रेल्वे स्थानकांमधून हलवले जातील. तिथून हे टँकर्स द्रवरुपी वैद्यकीय ऑक्सिजन टँकर लोड करण्यासाठी विशाखापट्टणम आणि जमशेदपूर, रुरकेला, बोकारो इथे पाठवण्यात येतील.