मुक्ताईनगर येथील यात्रोत्सव निवडक वारकऱ्यांच्या उपस्थित साजरा होणार
कोरोनाचे संकट टळू दे, आमची वारी मोकळी होऊ दे
मुक्ताईनगर: महाशिवरात्री निम्मित मुक्ताईनगर येथे आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई मंदिरात यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक वारकऱ्यांच्या उपस्थित यात्रोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने काही निर्बंध घालण्यात आले आहे. यामुळे भक्तांना उपस्थित राहता येणार नाही.
याबाबत श्री संत मुक्ताई संस्थानचे ह. भ. प. रवींद्र महाराज हरणे म्हणाले. आदिशक्ती संत मुक्ताबाईची यात्रा वारकरी संप्रदायात महत्वाची आहे. चांगदेव महाराज आणि संत मुक्ताबाई या गुरु शिष्याची संयुक्तिक यात्रा आहे. दरवर्षी राज्यभरातून २०० ते २५० वारकऱ्यांच्या दिंड्या मुक्ताईनगर मध्ये येतात. ज्या प्रमाणे आषाढी वारी, आळंदी येथील समाधी सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थित झाला त्याच प्रमाणे हा यात्रोत्सव प्रमुख वारकऱ्यांच्या उपस्थित पारंपारिक पद्धतीने साजरा होईल.
संत चांगदेव आणि संत मुक्ताबाई या गुरु शिष्याच्या भेटीचा अलौकिक सोहळा महाशिवरात्रीच्या दिवशी होतो. संस्थांचे अध्यक्ष आणि निवडक ५ वारकरी यांच्या उपस्थित होईल. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी यात्रोत्सवासाठी येणाऱ्या वारकऱ्या मार्फत गोपाळपूर जेथे पादुका आहेत तेथे काल्याचा कार्यक्रम करण्यात येतो. यावर्षी सुद्धा यात्रेची सांगता अशीच होणार आहे.
यंदा सर्वांनी मानसिक वारी करावी आणि पुढच्यावर्षी वारी करता यावी यासाठी प्रार्थना करावी. महामारीचे संकट दूर करावे आणि पिढ्यान पिढ्या सुरु असलेले वारी सुरळीत व्हावी अशी प्रार्थना रवींद्र महाराज हरणे यांनी केली.