Saturday, October 1, 2022
Homeब-बातम्यांचाकोरोना संकटात टाटा समूहाचा पुन्हा एकदा मदतीचा हात, पंतप्रधानांनी केलं कौतुक.

कोरोना संकटात टाटा समूहाचा पुन्हा एकदा मदतीचा हात, पंतप्रधानांनी केलं कौतुक.

नवी दिल्ली : संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट अत्यंत वेगानं पसरत असून गेल्यावेळीपेक्षा रुग्ण आढळण्याचे प्रमाण कितीतरी पट अधिक आहे. सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून, रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. यामुळे ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली असून, सगळा देश या संकटाशी झगडत आहे. अशा परिस्थितीत टाटा समूहानं जनतेच्या मदतीसाठी धाव घेतली असून, त्यांनी द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी २४ क्रायोजेनिक कंटेनर आयात करण्याची घोषणा केली आहे.
रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत असल्यानं रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, या कामात आता टाटा उद्योग समूहानंही मदतीचा हात पुढं केला आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल टाटा समूहाचं कौतुक केलं असून, या उद्योगसमुहाचा हा दयाळूपणा अतिशय प्रशंसनीय असल्याचं म्हटलं आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून टाटा समूहानं याबाबत माहिती दिली आहे. ‘द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टाटा समूहाकडून २४ क्रायोजेनिक कंटेनर चार्टर्ड फ्लाइट्सने आयात करण्यात येत असून, देशातील ऑक्सिजनची कमतरता कमी करण्यास आम्ही मदत करत आहोत. कोविड-19 विरुद्धच्या लढ्याला हातभार लावण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ऑक्सिजनचे संकट कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असं टाटा समूहानं म्हटलं आहे. तत्पूर्वी टाटा स्टीलच्या वतीनं दररोज ३०० टन ऑक्सिजन पुरवण्याची घोषणाही करण्यात आली होती.
टाटा समूहाच्या या घोषणेनंतर काही मिनिटांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं. ‘टाटा समूहाचा हा दयाळूपणा आहे. आपण सगळे भारतीय नागरिक कोविड-19 शी एकत्रितपणे लढा देऊ’ असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, टाटा समूहानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणाचेही कौतुक केलं असून, कोविड-19 विरुद्धचा लढा बळकट करण्यासाठी टाटा समूह सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं स्पष्ट केलं आहे. टाटा उद्योग समूहानं याआधीही कोरोना संकटाशी लढण्याकरता ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments