पंतप्रधानांनी देशातील तरुणांवर सोपवली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला. मोदींनी लॉकडाऊनपासून वाचण्यावरच भर दिला आहे. लॉकडाऊन लागू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सोबतच देशातील तरुणांनाही त्यांनी कोरोनाविरोधी लढ्यात मोठी जबाबदारी सोपवली आहे.
कोरोनाविरोधी लढ्यात अनेक लोकं, सामाजिक संस्था लोकांना मदत करत आहेत. आतापर्यंत कोरोनाशी लढा देत असताना आपण मोठ्या हिंमतीने लढा दिला. याचे श्रेय तुम्हाला जातं, असं मोदी म्हणाले. त्यामुळे आपण कोरोनाशी लढा देऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
या संकटाच्या वातावरणात गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढं यावं, लोकांच्या मदतीतून आपण कोरोनावर मात करू शकतो, असं मोदींनी सांगितलं. मोदींनी कोरोनाविरोधी लढ्यात विशेषत: तरुणांना पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. तरुणांनी आपल्या सोसायट्यांमध्ये समिती स्थापन करावी. कोरोनाचे नियम पाळण्याबद्दल जागृकता करावी, असं आवाहन पंतप्रधानांनी तरुणांना केलं आहे. जर आपण सर्वांनी नियम पाळले तर लॉकडाऊनची गरजच पडणार नाही, असं मोदी म्हणाले. देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. राज्य सरकारने सुद्धा लॉकडाऊनचा पर्याय हा शेवटचा पर्याय म्हणूनच निवडला पाहिजे, असं आवाहनही मोदींनी केले.
‘मागील वर्षी जी परिस्थिती होती, त्यावेळी आपल्याकडे लढण्यासाठी पीपीई कीट, ग्लोज, मास्क नव्हते. आता त्यात आपण सुधार केला आहे. देशात अनेक भागात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे केंद्र, राज्य आणि खासगी क्षेत्र पूर्ण ताकदीने काम करत आहे. सर्वांना आक्सिजन मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे. औषधाच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहे. आपल्या देशात मजबूत फार्मा कंपन्या आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये विशाल कोविड सेंटर तयार केले जात आहे. लोकांना मोठ्या प्रमाणात लशी देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही मोदींनी दिली.
जे दु:ख तुम्ही सहन करत आहे. त्याचं मला दु;ख आहे. मागील काही दिवसांमध्ये ज्यांनी आपल्या लोकांना गमावले असेल त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे मी तुमच्या दुखात सहभागी आहे’, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.