किराणा दुकानाच्या वेळेबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता; आरोग्य मंत्री म्हणाले…

मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन अधिक कडक करण्याचे संकेत मिळत आहेत. किराणा माल आणि इतर अत्यावश्यक सेवेतल्या दुकानाच्या वेळेत बदल करण्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले. विनाकारण बाहेर फिराणाऱ्यावर पायबंद आणायला हवा. त्यासाठी किराणा दुकान सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत चर्चा झाली आहे. याबाबतचा बदल जिल्हाधिकारी स्थरावरून न करता वरूनच बदल करावा अशी चर्चा बैठकीत झाल्याचे टोपे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे हे माध्यमांशी बोलत होते. टोपे म्हणाले, किराणा दुकान दिवसभर उघडे राहत आहेत. त्यामुळे किराणा दुकानाच्या नावाने अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यासाठी अजित पवार यांनी सकाळी ७ ते ११ असे चार तास किराणा दुकान सुरु ठेवूयात अस सांगितलं आहे. किराणाच्या नावाखाली दिवसभर बाहेर पडणे योग्य नाही. यामुळे दुकानाच्या वेळे बाबत करण्याचा विचार आहे. हा निर्णय जिल्हाधिकारी स्थरावरून न घेता वरच्या स्थरातून घेऊ असे बैठकीत ठरल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
सध्या ऑक्सिजन हा महत्वाचा विषय आहे. साडेबाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन वापरण्यात येत आहे. ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन भिलाई, बिल्लारी आणि विशाखापट्टणम येथून आणत आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात १ हजार ५५० मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्रात आहे. येत्या २० तारखे पर्यंत त्यात वाढ होणार आहे. जर कोरोना बाधितांची संख्या वाढली तर ऑक्सिजनची मागणी आणखी वाढणार आहे.
तसेच या बैठकीत रेमडेसिवीर बाबत चर्चा झाली. केंद्र सरकारने रेमडेसिवीर बनविणाऱ्या कंपन्यांना प्लांट लावण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे उत्पादन वाढणार असल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.