पीपीई किटमध्ये दिसणारी व्यक्ती वाझे?,एनआयए कडून तपास सुरू

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या असलेली कार पार्क करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहेत. दोन दिवसापूर्वी या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. इतकंच काय तर या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे आणि या प्रकरणाला रोज नवीन वळण येत आहे. सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएने पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही जप्त केली आहे.

सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर मुकेश अंबानी धमकी प्रकरणात वापरलेली पांढरी इनोव्हा गाडी ‘एनआयए’ने मुंबई पोलिसांच्या मोटार वाहन दुरुस्ती विभागातून (एमटी) रविवारी पहाटे जप्त केली. ही गाडी शासकीय असून, वाझे यांच्या पथकात होती, असे स्पष्ट झाले. गुन्हे शाखा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या गाडीचा कसोशीने शोध घेतला जात होता. अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडी पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किट घालून आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती वाझे होते की आणखी कुणी? स्कॉर्पिओ पार्क करताना त्यावेळी वाझे घटनास्थळी उपस्थित होते का? याचा तपास करण्यास एनआयएने सुरूवात केली आहे. एएनआयने हे वृत्त दिलंय.  

‘गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्ष’ या महत्त्वाच्या विभागाचे प्रमुख असलेल्या वाझे यांना शनिवारी रात्री १२ च्या सुमारास ‘एनआयए’ने अटक केली. अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात वाझे यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा ‘एनआयए’कडून करण्यात आला. ‘‘हे कृत्य वाझे यांनी कबूल केले. मात्र अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवणे, अंबानी कुटुंबाला धमकावण्याचा कट त्यांनी एकट्याने रचलेला नाही. या कटात अन्य व्यक्तीही सहभागी असाव्यात’’,असा संशय असल्याचे ‘एनआयए’कडून सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, आता एनआयएने स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या घराजवळ पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किटमध्ये असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. जिलेटीन असलेली गाडी पार्क करण्यात आली, त्यावेळी वाझे घटनास्थळी उपस्थित होते का? पीपीई किटमध्ये वाझे होते की दुसरी व्यक्ती होती? या प्रश्नांच्या अनुषंगाने एनआयएने तपास सुरू केला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *