अधिकाऱ्याने केली घोड्यावरून ऑफिसला येण्याची विनंती!

नांदेड: सतिष पंजाबराव देशमुख हे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात सहाय्यक लेखाधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक अजब विनंतीसाठी पत्र लिहिले आहे. ही विनंती रजा, बढती किंवा बदलीसाठी नसून यांना घोड्यावरून ऑफिसला यायचं आहे.
सतिष यांनी पाठीच्या कण्याचा त्रास असून दुचाकीवर ऑफिसला येताना त्रास होत असल्याचे पत्रात म्हटले आहे. पुढे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाहने लावतो तसे आपला घोडा बांधण्यासाठी परवानगी द्यवी अशी मागणी केली आहे. या आगळ्यावेगळ्या विनंतीमुळे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर पेचात पडले आहेत.
‘मी सतिष पंजाबराव देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कार्यरत आहे. मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे टू व्हिलरवर येण्यास त्रास होत आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे ठरवले आहे. घोड्यावर बसून विहित वेळेत कार्यालयामध्ये येणे मला शक्य होईल. मी घोडा आणल्यास त्याला कार्यालयीन परिसरात बांधण्याची परवानगी देण्यात यावी, ही विनंती’ असा या पत्रातील गमतीशीर मजकूर आहे.
शेवटी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांकडे याप्रकरणी सल्ला मागितला. यावर तेथील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाने ‘पाठीच्या कण्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी घोड्यावर प्रवास केल्यास आणखीन आदळ आपट होते. त्यामुळे मणका दबण्याची, मणक्यातील गादी दबण्याची तसेच सरकण्याची शक्यता असते. त्यामुळे पाठीच्या कण्याचा आजार कमी न होता तो वाढण्याची दाट शक्यता आहे’, असा अभिप्राय कळवला. सतिष देशमुख यांना तंबी देऊन त्यांची ही अजब विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्याचे समजते आहे.
मात्र काही काळानंतर देशमुख यांनी आपला अर्ज मागे घेतल्याचे सांगण्यात आले आहे.