अधिकाऱ्याच्या कामावर नगरपालिका खुश; चक्क दिले रस्त्याला नाव

माथेरान: महापुरुष, संत, सामाजिक भान जपणारे, यांचे नाव रस्ता, चौक, पुलाला देण्याची आपल्या देशात प्रथा आहे. मात्र, माथेरान नगरपालिका याला अपवाद ठरली आहे. चक्क चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव रस्त्याला देवून माथेरान नगरपरिषदेने सर्वांसमोर आदर्श घालून दिला आहे. आता पर्यंत या अधिकाऱ्याने कर्जत, वेंगुर्ला आणि माथेरान ही शहरे कचरा मुक्त केली आहे.
माथेरान येथील सेट व्हिला ते जुन्या डम्पिंगला जाणाऱ्या रस्त्याला नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास तुकाराम कोकरे यांचे नाव देण्यात आले आहे. ओला-सुका कचरा वर्गीकरण, डम्पिंग मुक्त माथेरान आदी उल्लेखनीय कामगिरी आपल्या कार्यकाळात बजावली होती. नुकताच माथेरान नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सेट व्हिला ते जुन्या डम्पिंगला जाणाऱ्या रस्त्याला रामदास कोकरे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
शहरातील रस्त्याला अधिकाऱ्याचे नाव देण्याची ही घटना दुर्मिळ आहे. सध्या रामदास कोकरे हे कल्याण-डोंबिवली महापालिकेत उपआयुक्त आहेत.
काही वर्षापूर्वी पासून माथेरान येथील खेळाचे मैदान डम्पिंग ग्राउंड झाले होते. रामदास कोकरे हे कर्जत नगरपालिकेत मुख्याधिकारी होते. त्यांच्याकडे माथेरान नगरपालिकेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्यानंतर रामदास कोकरे यांच्या लक्षात आले की माथेरान मधील सरावत मोठी समस्या ही कचऱ्याची आहे. रामदास कोकरे यांनी कार्यभार स्वीकारताच आपल्या वेंगुर्ले पॅटर्न राबविला. त्यात त्यांना यश आले असून माथेरान कचरामुक्त शहर झाले आहे.
माथेरानच्या हद्दीत सुमारे तीन मेट्रिक टन कचरा निर्मिती होते. यातील २ टन ओला कचरा आणि १ टन सुका कचरा जमा होतो. यातील ओला कचरा माथेरान येतील बायोगॅस प्रकल्पात १०० टक्के प्रक्रिया केला जातो. कोकरे यांनी डम्पिंग जाणार कचरा बंद करून बायोनिर्मिती प्रकल्प सुरु केला आहे. अशा प्रकारे कोकरे यांनी उल्लेखनीय काम केल्याने माथेरानच्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
घनकचरा व्यवस्थापनात रामदास कोकरे यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांनी कर्जत, वेंगुर्ला आणि माथेरान येथे कायापालट केला आहे. सध्या कल्याण-डोंबिवली महापालिका डम्पिंग ग्राउंड मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
रामदास कोकरे यांना आता पर्यंत २५ पुरस्कार मिळाले आहेत. त्यात रत्नागिरी भूषण, सर्वोत्कृष्ट मुख्याधिकारी, वसुंधरा मित्र, समाज भूषण आदी पुरस्काराचा समावेश आहे. त्यांनी विविध नगरपरिषदांना तब्बल ३२ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहे.