परमबीर सिंह यांच्या नंतर सचिन वाझे यांचा लेटरबॉम्ब

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब नंतर आता निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील ३ मंत्र्यावर आरोप केले आहेत. पत्रात अनिल देशमुख यांनी नियुक्तीसाठी २ कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे.
“आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्याचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ कोटीं रुपयांची खंडणी मागितली होती. असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी NIA लिहिलेल्या पत्रात केला आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.
वाझे यांनी स्वताच्या हस्ताक्षरात NIA ला पत्र लिहिले आहे. २०२० मध्ये पोलीस दलात परत घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. माझी नियुक्ती रद्द करावी, अशी शरद पवार यांची इच्छा होती. मात्र, आपण पवारांचे मतपरिवर्तन करू. अस तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. या कामासाठी अनिल देशमुख यांनी २ कोटी मागितल्याचा आरोप वाझे यांनी केला.