दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय; कारमध्ये एकटे असला तरीही मास्क वापरणे अनिवार्य

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची स्थिती अवघड होत आहे. राजधानी दिल्ली सुद्धा वाढत्या कोरोना संक्रमणानं बेजार झाली आहे. दिल्लीत प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. अशावेळी दिल्ली उच्च न्यायालयने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कारमध्ये जरी एकट्याने प्रवास करत असाल तरी देखील मास्क वापरणे अनिवार्य असणार आहे. यासंदर्भात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली दिल्ली उच्च न्यायालयने हा निर्णय दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने चारचाकी एक सार्वजनिक ठिकाण असल्याचे म्हटले आहे, अशावेळी मास्क वापरणे अनिवार्य आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना असे म्हटले की, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मास्क एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. मास्क तो परिधान करणाऱ्या व्यक्तीचीही सुरक्षा करतं, त्याचप्रमाणे त्याच्या समोर असणाऱ्या व्यक्तीचीही. मास्क हा असा उपाय आहे ज्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचला आहे, असे दिल्ली दिल्ली उच्च न्यायालयने म्हटले आहे.
कोणतंही प्रवासी वाहन हे सार्वजनिक स्थळ
न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार, दिल्लीत यापुढे प्रत्येक व्यक्तीला मास्क परिधान करणं अनिवार्य राहील. एखादी व्यक्ती गाडीतून एकटी प्रवास करत असेल तरीदेखील त्या व्यक्तीला मास्क परिधान करावं लागेल. कोणत्याही वाहनातून व्यक्ती प्रवास करत असेल तरी ते सार्वजनिक स्थळ आहे, त्यामुळे तिथेही मास्क अनिवार्य असल्याचं न्यायालयानं म्हटलंय.
दिल्ली सरकारकडून एप्रिल महिन्यापासून गाडी चालवतानाही मास्क परिधान करणं अनिवार्य केलं होतं. सरकारच्या या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. खासगी गाडीतून एकट्यानं प्रवास करत असतानाही दंड लावणं अन्यायकारक असल्याचं सांगत सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. या चारही याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावल्या आहेत.