बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार – एकनाथ शिंदे

बाळासाहेब ठाकरे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई, दि. 16 : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे स्मारक जनतेला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच स्मारकाचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दादर येथील महापौर बंगला परिसरात सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी आढावा बैठकही घेतली. बैठकीस मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहूल शेवाळे, आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, माजी मंत्री रामदास कदम, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर श्रीनिवास उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले, आज या स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाले असून मार्च २०२३ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्यात येईल.

बाळासाहेबांच्या स्मारकातून जनतेला प्रेरणा मिळणार असून त्यासाठी त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. स्मारकाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जनतेचे असून ते लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला हे स्मारक समर्पीत करण्याचा मानस असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *