टी -२० मालिकेचा अंतिम सामना, आज होणार ‘फैसला’!
अहदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी -२० मालिकेचा पाचवा आणि अंतिम सामना आज होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा हा सामना एक प्रकारे अंतिम आहे, कारण जी टीम जिंकेल तो मालिका देखील हस्तगत करेल. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये दोन्ही टीम्सने प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत.
आतापर्यंत २-२ अशी बरोबरी आहे. चौथ्या सामन्यात टीम इंडियाने दुसऱ्यांदा गोलंदाजी करताना सामना जिंकला आहे. या मालिकेत भारताने जिंकलेल्या दोन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी मोठे योगदान दिले. पहिल्या विजयात ईशान किशन आणि दुसर्या विजयात सूर्यकुमार यादवने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
आजच्या सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा ओपनिंग करू शकतील असा अंदाज आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सीरिज जिंकल्यानंतर आता पुन्हा एकदा टी-२० सामना जिंकण्याची संधी आहे. जर हा सामना भारतीय संघ जिंकला तर टी २० सामना जिंकण्याची ही सहावी वेळ असणार आहे. आतापर्यंत टीम इंडियाने ५ वेळा आंतरराष्ट्रीय टी २० सीरिज जिंकले आहेत.
अहवालानुसार मालिकेचा अंतिम सामना धीम्या विकेटवर खेळला जाऊ शकतो. वास्तविक, या मालिकेच्या पहिल्या आणि तिसर्या सामन्यात खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना खूप मदत करत होती. यामुळे इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. पण चौथ्या सामन्यात खेळपट्टी खूपच हळू होती, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना जास्त उसळी मिळत नव्हती. पाचव्या टी -२० मध्येही खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरू शकते.
हा सामना सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरू होईल, तर टॉस सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यावर दोन्ही टीम्सचे लक्ष असणार आहे.क्रिकेटप्रेमी देखील या सामन्यासाठी उत्सुक आहेत.