तो घटस्पोट इतका गाजला की, इग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांना सुद्धा दखल घ्यावी लागली होती.

rakhmabai raut
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर रखमाबाई राऊत आपल्या अस्तित्वासाठी त्यांनी दिलेला लढा पाहिला तर आपल्याला कळून येईल. १८व्या शतकात नवरा निरोद्योगी आहे म्हणून सासरी जाण्यास नकार देणाऱ्या घटस्फोटीत या बाईने समाजात स्वतःचे स्थान इतक्या उंचीवर नेऊन ठेवले की, त्या भारतातल्या प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. त्यांच्याबद्दलच आज आपण जाणून घेऊया.

रखमाबाई यांचे आजोबा हरिश्चंद्र यादवजी चौधरी इंग्रज सरकारच्या नोकरीत असल्याने त्यांचा सरकारी दरबारात मानमरातब होता. हरिश्चंद्र चौधरी यांनी जयंतीबाई नावाच्या स्वतःच्या मुलीचा विवाह १८६३ साली मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक जनार्धन सावे यांच्याशी लावला. जनार्धन व जयंतीबाई यांच्यापोटी २२ नोव्हेंबर १८६४ रोजी रखमाबाईंचा जन्म झाला. मात्र लवकरच १८६५ मध्ये जनार्धनरावांचे निधन झाले. आपल्या विधवा मुलीचा व नातीचा भविष्यकाळ सुखाने जावा म्हणून हरिश्चंद्र चौधरी यांनी आपल्या मुलीचा पुनर्विवाह डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी लावून दिला. राऊत हे ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई येथे प्राध्यापक होते. ते आधुनिक विचारसरणीचे होते. डॉ. राऊतांनी छोट्या रखमाबाईंचासुद्धा स्वीकार केला व रखमाबाई ‘सावे’ ऐवजी ‘राऊत’ झाल्या.

काय होते प्रकरण:

पालघर जिल्ह्यातील सफल्याजवळील दातीवरेचे दादाजी भिकाजी ठाकूर यांच्याशी वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. मुलीने वयात येईपर्यंत आईवडिलांकडे राहण्याची प्रथा त्याकाळी होती. साहजिकच १८ वर्षांपर्यंत रखमाबाई माहेरीच राहिल्या. त्यानंतर १८३३ साली दादाजीने त्यांना आपल्या घरी बोलावलं. मात्र दरम्यानच्या काळात शिक्षणामुळे रखमाबाईंच्या विचारांची पातळी उंचावली होती. दादाजी श्रीमंत होते. परंतु निरोद्योगी होते. कुठलाच उद्योग, व्यवसाय न करता, ते आपले मामा नारायण धर्माजी यांच्याकडे राहत होते. त्यामुळे अशा निरोद्योगी माणसाच्या घरी राहण्यास रखमाबाईंनी स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे डॉ. सखाराम राऊतांनीही दादाजींना कळवलं की, प्रतिष्ठेने राहता येईल असं वातावरण आपल्याकडे नसल्यामुळे मी माझ्या मुलीला आपल्याकडे पाठवू शकत नाही. त्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले. रॉबर्ट हिल पिन्हे यांच्या न्यायालयात चाललेल्या या खटल्यात के.टी तेलंग यांनी रखमाबाईंची बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती पिन्हे ह्यांनी ‘लहानपणी लग्न झालेली मुलगी आता सज्ञान झाली आहे. निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आली आहे. चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या स्त्रीला नवऱ्याकडे पाठविण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल.’ असं सांगून निर्णय रखमाबाईंच्या बाजूने दिला. न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे बुजुर्ग मंडळी खडबडून जागी झाली. ‘नेटिव्ह ओपिनियन’ ह्या इंग्रजी दैनिकातून कोर्टाच्या निर्णयावर टीका करण्यात आली. लोकमान्य टिळकांनीही आपल्या ‘केसरी’ वर्तमानपत्रातून टीकेची झोड उठविली.

दादाजींनी मात्र या खटल्याचा विरोधात न्यायमूर्ती फेरेन यांच्या कोर्टात दावा दाखल केला. यामध्ये मात्र दादाजी खटला जिंकले. मात्र रखमाबाईंनी नवऱ्याच्या घरी जाण्यास नकार दिला. शेवटी खटला इंग्लंडच्या प्रिव्ही कौन्सिलमध्ये गेला. या खटल्यास ‘लंडन टाइम्स’ व ‘सेंट जेम्स गॅझेट’ वृत्तपत्रांनी प्रसिद्धी दिली. तर प्राध्यापक वर्डस्वर्थ यांनी ‘रखमाबाई ए हिंदू लेडी डिफेन्स कमिटी’ या संस्थेची स्थापना केली. मात्र दादाजी ठाकूर वं नारायण धर्माजी यांनी काढता पाय घेऊन खटला चर्चेने सोडविण्याचा निर्णय घेतला. यात रखमाबाईंनी लग्नाचा व कोर्टाचा खर्च २००० रुपये दादाजी ठाकूरांना देऊन ५ जुलै १८८८ रोजी कायदेशीर घटस्फोट घेतला.

या सर्व काळात २३ वर्षांच्या रखमाबाई सामाजिक बहिष्काराला व टीकेला सरावल्या होत्या. खंबीरपणे सामोरे गेल्या होत्या. अन्यायाला विरोध करणाऱ्या त्या रणरागिनी बनल्या होत्या. परिणामी हा वाद जेंव्हा चिघळत गेला होता तेंव्हा देशभरातील प्रमुख वर्तमानपत्रांतून ह्या विषयासंबंधी बातम्या येऊ लागल्या. न्यायमूर्ती रानडे, गोपाळराव आगरकर, डॉ. भांडारकर, रावसाहेब मांडलिक तसेच पंडिता रमाबाई अशी विद्वान मंडळी रखमाबाईंच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहिली होती .

संघर्षमय भूतकाळ मागे सोडत त्यांनी आपलं लक्ष पुढील शिक्षणाकडे केंद्रीत केलं. त्यांच्या संघर्षमय जीवनामुळे त्यांचं नाव इंग्लंडमधील अनेक स्त्रियांना परिचित झालं होतं. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी बरीच मदत झाली होती. एडीच पीची फिप्सन यांनी वैद्यकीय शिक्षण खर्च उचलण्याची दिलेली हमी व लेडी मॅकलारेन यांनी राहण्याची सोय उपलब्ध केल्यावर ऑक्टोबर १८९० मध्ये लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमेन या कॉलेजात त्यांनी प्रवेश घेतला. १८९१-९२ मध्ये अनुक्रमे पहिली व दुसरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी रॉयल हॉस्पिटल मध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग साठी प्रवेश घेतला. बाळंतपणातील शस्त्रक्रिया या विषयात लंडन कॉलेज ऑफ मेडिसिनमध्ये त्यांनी ऑनर्स मिळवला. विविध विषयांचा अभ्यास केल्यानंतर १८९४ मध्ये त्या वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या. मात्र लंडन विद्यापीठाला वैद्यकीय पदवी देण्याचा अधिकार नव्हता. तेव्हा त्यांनी जॉईंट बोर्ड ऑफ कॉलेजेस ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ एडिंबरो येथे प्रवेश घेतला.

 येथे त्या उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाल्या व त्यांच्या नावापुढे M.D आणि L.R.C.A (Lucentio of the Royal College of physician and surgeon) ही पदवी लागली. डिसेंबर १८९४ मध्ये भारतात परतल्या. लंडनमधील वैद्यकीय शिक्षणासाठी रखमाबाईंना १८८५ साली स्थापन झालेल्या डफरीन फंडाची शिष्यवृत्ती देखील महत्त्वाची ठरली आहे. होरमुसजी पेस्तनजी कामा यांनी केवळ स्त्रिया आणि मुलांसाठी फक्त महिला डॉक्टर असणारे हॉस्पिटल उघडण्यासाठी १,६४,००० रुपयांची देणगी दिली. त्यातून १८८० मध्ये कामा हॉस्पिटल ची उभारणी करण्यात आली.

१८ फेब्रुवारी १८९५ रोजी डॉ. रखमाबाई यांची मेडिकल ऑफिसर म्हणून काम हॉस्पिटलमध्ये नियुक्ती झाली. १८९५ मध्ये सुरत मधील कामा हॉस्पिटलची शाखा सुरू होताच मुंबईतील हॉस्पिटलचा राजीनामा देऊन त्या सुरतला कार्यरत झाल्या. सुरत मधील शेठ मोरारजीभाई वज्र भूषण दास मालविया हॉस्पिटलच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. १८९६ मध्ये सुरत मध्ये प्लेगची साथ आली तेव्हा त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने त्यांना ‘केसर ए हिंद’ हा बहुमान दिला. १८८५ च्या दरम्यान ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये त्यांनी ‘हिंदू लेडी’ या टोपण नावाने लिखाण सुद्धा केले आहे. १८८४ ते ८५ साली मुंबई आर्य महिला समाजाच्या त्या चिटणीस म्हणून कार्यरत होत्या.

१९१७ मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही त्या सतत कार्यरत असायच्या. त्यांनी स्त्रियांमधील अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हाती घेतले आणि विधवा स्त्रियांसाठी ‘वनिता’ या नावाने आश्रमाची स्थापना केली. १९३२ मध्ये त्यांनी गावदेवी मंदिर अस्पृश्यांना खुलं केलं. त्यांनी कामाठीपुरातील शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने आयोजित केली.  अशा धडपड्या स्त्री जिचा आदर्श आम्हा प्रत्येक पिढीला असेल. अशा वैद्यकीय व सामाजिक कार्यासाठी योगदान देणाऱ्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत धडपडणाऱ्या रखमाबाईंनी २५ डिसेंबर १९५५ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *