देशाला बेफिकीर नेतृत्व मिळाल्याने देशाची जगात नाचक्की; कॉंग्रेसची पंतप्रधानावर घणाघाती टीका

मुंबई : देशभरात १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मात्र, लस उपलब्धतेबाबत राज्य सरकार अजूनही संभ्रमाच्या अवस्थेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ यांच्याशी लस पुरवठ्या बाबत विचारणा केली. केंद्र सरकारने लसी बुक केल्याने राज्य सरकारला लस मिळणार नसल्याची चिन्हे आहेत. याबाबत कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाचा कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच देशाला अशा भयंकर संकटात अत्यंत बेफिकीर नेतृत्व मिळाले व देशाची जगात नाचक्की होत आहे. हे देशाचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली आहे.
याबाबत कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत ट्वीट करून म्हणाले, सिरमने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले की २० मे पर्यंत लस पुरविता येणार नाही. कारण सर्व साठा मोदी सरकारने बुक केलेला आहे. यामुळे १ मे पासून होणारा १८-४४ या वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाचा कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोरोना आल्यानंतर इतक्या महिन्यांनंतर आपण लसींच्या अभावावर चर्चा करणे हे संपूर्णपणे चुकीचे आहे.
मोदीजी, तुमची रणनीती कोठे आहे? मोदीजींना एवढ्या मोठ्या लसीकरणासाठी पुरवठा कसा होणार याची कोणतीही माहिती नाही. मोदीजींनी २ कंपन्यांकडून पुरवठा मर्यादित केला व म्हटले की राज्य सरकारने १८-४४ गटातील लसीकरणासाठी या कंपन्यांकडून खरेदी करावी. केंद्र सरकार केवळ ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाची काळजी घेईल. बाकीची जबाबदारी राज्यावर ढकलली. मोदीजी, संपूर्ण देशात लसीकरण पूर्ण होण्याचे लक्ष्य जनतेला सांगा. तारीख सांगू शकता? देशाला अशा भयंकर संकटात अत्यंत बेफिकीर नेतृत्व मिळाले व देशाची जगात नाचक्की होत आहे हे देशाचे दुर्दैव अशी टीका सुद्धा सचिन सावंत यांनी केली.