नरेंद्र मोदींच्या ‘या’ निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
मुंबई : कोरोना महामारीची दुसरी लाट देशात जोर धरत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत आहे. त्यासाठी लस हा सर्वात उत्तम मार्ग आहे. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. तसेच देशात लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कोरोना लसीची कोणताही तुटवडा भासणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डल वरून केंद्रसरकारचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. “देशातील ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मागणी केंद्राने मान्य केली आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली होती. या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत ” असं ट्विट करण्यात आलं आहे.
आतापर्यंत केवळ सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती. येत्या एक एप्रिलपासून ४५ वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. ४५ वर्षांवरील प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी, असं आवाहन जावडेकरांनी केलं.
वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे सध्या लसीकरण करण्यात येत आहे. ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचेही तूर्तास लसीकरण सुरु आहे. या दोन्ही वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी १ जानेवारी २०२२ रोजीचे वय विचारात घेतले जात आहे. यानुसार आज ज्यांचे वय ५९ वर्षे ३ महिने किंवा सहव्याधी असणाऱ्या गटातील व्यक्तीचे वय ४४ वर्षे ३ महिने असले तरीही त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य आहे.