वेगवेगळी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी समज दिली पाहिजे – रावसाहेब दानवे

जालना : राज्यासह देशभरात कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून राज्य सरकारने स्वतः ऑक्सिजन निर्मितीची वाढ करण्यासह केंद्राकडे मदत मागितली आहे. तसेच, रेमडेसिवीर इंजेक्शन व लसींचा देखील महाराष्ट्राला असलेली गरज बघता अधिक पुरवठा करावा अशी मागणी महाविकास आघाडी सरकारने केली आहे.
‘राज्य सरकार सर्व प्रकारे अक्षरश: नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायला तयार आहे. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे.’ असं विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे .
‘कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असं शास्त्रज्ञांचं मत होतं. मात्र मधल्या काळात आरोग्याच्या ज्या काही सुविधा वाढायच्या होत्या त्याकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केलं आणि आपलं अपयश झाकण्याकरता उठसूट केंद्राकडे बोट दाखवत आहे. त्यामुळे हात पाय जोडून नाही तर अमंलबजावणीकडे लक्ष द्या’ असं भाष्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी समज दिली पाहिजे, असंही दानवे म्हणाले आहेत. त्यांनी आज जालन्यात पत्रकारांशी संवाद साधला आहे.