महाविकासाघाडी कडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पा बाबत कोण काय म्हणाले, जाणून घ्या…
मुंबई: महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर हा दुसरा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. कोरोना नंतरचा अर्थसंकल्प असल्याने सगळ्यांचे याकडे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचे सांगण्यात आले. तर विरोधीपक्षाकडून निराशाजनक अर्थसंकल्प असल्याची टिका करण्यात आली.
अर्थसंकल्पावर कोण काय म्हणाले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे: रडगाणे न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे. कोरोनामुळे हे वर्ष आव्हानात्मक आहे. महाराष्ट्र कोठेही थांबला नाही. थांबणार नाही. महिलांना आपल्या पायावर स्वाभिमानाने उभे करत आहोत. कृषी, उद्योग, शिक्षण या प्रत्येक क्षेत्राला गती देण्याचे काम केले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस: अर्थसंकल्पाने निराशा केली आहे. प्रामाणिक शेतकऱ्यांना काहीही मिळालेलं नाही. मूळ कर्जमाफीच्या योजनेत ४५ टक्के शेतकरी वंचित राहिला आहे. त्यांना एका नव्या पैश्याची मदत झालेली नाही. शेतकऱ्यांना धान्यासाठी, विजेसाठी कुठलीही सवलत दिली नाही. तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज ही फसवी बाब आहे. राज्यात ८० टक्के कर्ज घेण्याची मर्यादा ५० टक्के आहे. यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ होणार नाही. पायाभूत सुविधा एकतर सुरु असलेले प्रकल्प आहे, किंवा केंद्र सरकारच्या योजना असल्याचे सांगत फडणवीस यांनी हे महाराष्ट्राचे बजेट आहे कि मुंबईचा असा प्रश्न यावेळी विचारला.
विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर: हे शेतकऱ्या बाबतचे फसवे धोरण आहे. अर्थसंकल्पात कोरोनाचे कारण पुढे करून मागील योजना पुढे मांडल्या आहेत. एक रुपयात पॅथॉलॉजी लॅबची घोषणा किमान समान कार्यक्रमात होती, त्याचे काय झाले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ४ हजार ५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे हे फसवे धोरण आहे. अशी टीका त्यांनी केली आहे.
कोरोनाचे कारण पुढे करुन मागील योजना पुन्हा मांडल्या. १ रुपयामध्ये पॅथॉलॉजी लॅबची घोषणा किमान समान कार्यक्रमात होती, त्याचे काय झाले. मविआ सरकार स्थापन झाल्यापासून ४५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत,त्यावर भाष्य नाही. त्यामुळे हे फसवे धोरण आहे. #BudgetSession @BJP4Maharashtra
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) March 8, 2021
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले: महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प आरोग्य सेवेला बळकटी देणारा, कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन महाराष्ट्राला पुन्हा विकासपथावर घेऊन जाणार अर्थसंकल्प असल्याचे पटोले यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा, कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन महाराष्ट्राला पुन्हा विकासपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे.
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 8, 2021
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड: अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, युवा, कष्टकरी आदी वर्गासाठी तरतूद करण्यात आली. आरोग्य विभागासाठी मुलभूत सुविधेसाठी मोठी तरतूद केली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून जीर्ण शाळेबद्दल मागणी करण्यात येत होती. त्यासाठी ३ हजार कोटींचा निधी दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीचे स्वागत केले आहे. राज्याची आर्थिक कोंडी करण्यात आली असतांना सर्व क्षेत्राला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याच्या बिकट परिस्थितही शेतकरी, कष्टकरी, महिला, असंघटित कामगार, युवक व विद्यार्थी यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आज ‘महिलादिनी’ महाविकास आघाडीच्यावतीने मा. अर्थमंत्री @AjitPawarSpeaks जी यांनी सादर केला. महिलांच्या विविधांगी योजनांचा समावेश अर्थसंकल्प करण्यात आला आहे. pic.twitter.com/37J21xg0aV
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 8, 2021