‘त्या’ व्हायरल व्हिडीओमधील अंधमातेने मयुरचे मानले आभार !

एकुलत्या एक मुलाचे प्राण वाचवल्याबद्दल व्यक्त केले आभार
मुंबई : मुंबई जवळील वांगणी रेल्वे स्थानकावर एका अंधमातेच्या मुलाला पॉइंटमनने प्रसंगवधान दाखवत वाचवले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मला एकूलता एकच मुलगा असून तोच मला आधार आहे, असं म्हणत अंध मातेनं पॉइंटमन मयूर शेळकेचे आभार मानले आहे. तसंच, त्याला एखादे बक्षीस किंवा पुरस्कार द्यावा, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.
अंध मातेनं घडलेल्या घटनेवर आपली प्रतिक्रिया देत मयूर शेळकेचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
‘त्या दिवशी आम्ही रेल्वे पकडण्यासाठी चाललो होतो. आमचं हातावर पोट आहे, म्हणून काम करावं लागत असतं. म्हणून मी माझ्या मुलाला घेऊन चालली होते. त्याचवेळी माझा मुलगा रेल्वेच्या रुळावर पडला होता. समोरून मोठी एक्स्प्रेस गाडी आली होती. तिथे कुणीही मदत करण्यासाठी नव्हतं. पॉइंटमन मयूर शेळके हा तरुण होता. त्याने जीव धोक्यात घालून माझ्या मुलाचे प्राण वाचवले. त्याच्या या धाडसाबद्दल त्याला बक्षीस द्यावे, कोणता तरी पुरस्कार द्यावा, ही माझी नम्र विनंती आहे, अशी इच्छा या अंधमातेनं बोलून दाखवली. ‘मला एकच मुलगा आहे, तो आज इथे आहे, तोच मला आधार आहे. मयूरने आपला जीव धोक्यात घालून माझ्या मुलाला वाचवलं, असं म्हणत या महिलेनं मयूरचे आभार मानले.
मयुर शेळकेने एबीपी माझाशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया –
‘शनिवारच्या दिवशी नेहमीप्रमाणे उद्यान एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने जात होती. त्यासाठी पॉईंटमन म्हणून माझं काम करण्यासाठी ट्रॅक जवळ गेलो. ज्यावेळी गाडी वांगणी स्टेशन जवळ येत होती त्याचक्षणी अंध महिलेच्या सोबत असलेला लहान मुलगा खाली ट्रॅक वर पडला. मी हे पाहताच कसलाच विचार न करता धाव घेतली. त्यावेळी काही क्षण भीती वाटली कारण तिथे आपला सुद्धा जिवाला धोका आहे असं वाटलं. पण त्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी हे धाडस करणं गरजेचं होतं आणि त्यात मी यशस्वी झालो. त्याचा खूप आनंद मला झाला आणि त्याच हे कौतुक भारावून टाकणारं आहे’, अशी प्रतिक्रिया मयुर शेळकेने एबीपी माझाशी बोलताना दिली.
हा सगळा थरार वांगणी स्टेशन प्लॅटफॉर्मच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्यानंतर जेव्हा हा व्हिडीओ वायरल झाला तेंव्हा या मयुर शेळकेच्या धाडसाचं कौतुक सोशल मीडियावर सर्वत्र केलं जातंय. या कौतुकाचा वेगळा आनंद मयुरला झाला असून त्यांनी याबाबत सगळ्यांचे आभार मानले व या प्रसंगातून जीव धोक्यात घालून एक कर्तव्य पार पडल्याचं त्यांनी सांगितलं.