मोठी बातमी ! १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण होणार

मुंबई : कोरोना लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आता १८ पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे.१ मे पासून लसीकरणाचा पुढचा सर्वात मोठा टप्पा आता सुरू होणार आहे. ज्यामध्ये १८ पुढील सर्व वयाच्या लोकांना लस दिली जाणार आहे.
देशात जानेवारीपासून लसीकरण सुरू झालं. टप्प्याटप्प्याने लस दिली जात आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं. सोबतच ४५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांना इतर आजार आहेत त्यांना कोरोना लस दिली जात होती. १ एप्रिलपासून ४५ पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं आणि आता १ मे पासून १८ पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे.
देशातील जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्या दिशेने सरकारने टाकलेलं हे मोठं आणि महत्त्वपूर्ण असं पाऊल आहे. देशातील लसीकरणाला वेग दिला जातो आहे.