गृहमंत्र्यांवर झालेले आरोप गंभीर
दिल्ली: शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते. त्यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा झाली. ही चर्चा झाल्यानंतर जयंत पाटलांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की “आमची चर्चा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीबाबतच झाली. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही.”
याआधी, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की अनिल देशमुख यांच्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. पूर्ण चौकशीअंती त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्फोटकांची गाडी ठेवल्याचे प्रकरण, सचिन वाझे यांची अटक आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणाची माहिती पवार यांनी यावेळी दिली.
परमबीर सिंह यांच्या पत्रावर त्यांची सही नाही. सचिन वाझेंची पुन्हा नियुक्तीही परमबीर यांनीच केली होती. परमबीर सिंह यांचे आरोप त्यांच्या बदलीनंतर करण्यात आले आहेत. परंतु त्यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत. या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता. याप्रकरणाची कसून चौकशी व्हायला हवी. असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. परंतु मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा विषय किंवा त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील, असेही पवार यावेळी म्हणाले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. याप्रकरणी कोणती पावलं उचलावी, हेही मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, असंही शरद पवार म्हणाले.
याशिवाय “सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, पण त्यामुळे काहीही होणार नाही. महाविकास आघाडी सरकारला या प्रकरणाचा धोका नाही,” असा दावाही शरद पवार यांनी केला आहे.