मिर्ची म्युझिक दशकातील सर्वोत्कृष्ट संगीतकार ‘अजय-अतुल’!
मुंबई: ऋतिक रोशन आणि प्रियंका चोपड़ा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अग्निपथ’ हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्याचबरोबर यातील गाणीही तुफान गाजली. त्यातील ‘अभी मुझमें कहीं’ हे गाणं तर प्रेक्षकांच्या अतिशय आवडीचं. हे गाणं किंवा हेच काय ‘अग्निपथ’ चित्रपटातील सगळीच गाणी आजही ऐकली जातात.
हिंदी संगीतामध्ये मानाचा समजला जाणारा मिर्ची म्युजिक पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावर्षीच्या मिर्ची म्युजिक पुरस्कार सोहळ्यात गेल्या दहा वर्षातील सर्वोत्कृष्ट संगीत आणि संगीतकार यावर जास्त भर दिला गेला होता. या सोहळ्यात अशी एक खास गोष्ट घडली जे ऐकून प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून येईल. मराठीपाठोपाठ बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध संगीतकार-गायकांची जोडी अजय-अतुल यांना अग्निपथमधील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा तसेच सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराची माहिती त्यांनी स्वत: आपल्या सोशल मिडियावर शेअर केली आणि या पुरस्कार सोहळ्याचे आणि तमाम चाहत्यांचे आभार मानले.
अग्निपथ चित्रपटातल्या ‘अभी मुझमें कहीं’ या गाण्याला मिर्ची म्युजिकचा दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून पुरस्कार मिळालाय. याच गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून अजय-अतुल यांना पुरस्कार मिळाला. तब्बल दहा वर्षानंतर हा पुरस्कार मिळणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असेही अजय-अतुल यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर या गाण्याचे गायक सोनू निगम, गीतकार अमिताभ भट्टाचार्य आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे देखील अभिनंदन केले. याचबरोबर या सोहळ्यात दशकातील उत्कृष्ट म्युजिक अल्बमचा पुरस्कार रॉकस्टार या चित्रपटाला, उत्कृष्ट गायक सोनू निगम,उत्कृष्ट गायिका श्रेया घोषाल यांना मिळाला आहे.