जितेंद्र आव्हाडांच्या ‘या’ निर्णयामुळे टाटा रुग्णालय मानतंय आभार!
मुंबई: मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या एकूण रुग्णांपैकीरु ३९ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून येत असतात. तर, ६१ टक्के रुग्ण देशभरातून आलेले असतात. टाटा कॅन्सर हॉस्पिटल दरवर्षी ८० हजार रुग्णांवर उपचार करते. तर दररोज सुमारे ३०० रुग्णांच्या राहण्याची सोय करण्याची आवश्यकता भासत असते. मात्र यांपैकी सर्वच रुग्णांच्या राहण्याची सोय होण्याची सध्याची स्थिती नाही.
‘म्हाडा’ने आपले १०० प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी गुरुवारी टाटा रुग्णालय आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळी या निर्णयाची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे कर्करोगावर देशभरातून टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने हॉस्पिटलला १०० फ्लॅट्स दिल्यामुळे १हजार रुग्णांची सोय करता येणार आहे. पुढे ही संख्या २हजार पर्यंत नेण्याचा सरकारचा विचार आहे. आपण हा निर्णय अवघ्या ७ दिवसात घेतलाय असं आव्हाड यांनी सांगितलंय. यात यापुढे कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नसून या फ्लॅट्सची चाव्या दिल्यानंतर आता पुढील जबाबदारी टाटा कॅन्सर हॉस्पिटलची असेल असे आव्हाड म्हणाले.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टाटा रुग्णालयाचे अधिकारी आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. टाटा रुग्णालयापासून ५ मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हाजी कासम चाळ परिसरात म्हाडाचे १०० फ्लॅट्स आहेत. हे फ्लॅट्स टाटा रुग्णालयाला देण्याचे आव्हाड यांनी जाहीर केले. हे फ्लॅट टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याबाबत काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी म्हटले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय.
देशातील विविध राज्यांमधून, तसेच महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यातून मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात हजारो सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांच्यासाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे शेवटचे आशास्थान असते. त्यांच्यापैकी अनेकांना मुंबईत राहण्याची सोय परवडत नसल्यामुळे रस्त्यावर, फूटपाथवर राहावे लागते. सरकारच्या या निर्णयामुळे आता यांपैकी अनेकांची चांगली सोय होणार आहे.या निर्णयामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचेही आभार व्यक्त केले जात आहेत.