टेस्लाचं भारतातील पहिलं शोरूम मुंबईत, कंपनीच्या कामकाजाला लवकरच सुरवात होणार

मुंबई : इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी असलेल्या अमेरिकेतील टेस्ला (Tesla) कंपनीच्या भारतातील कामकाजाला लवकरच सुरुवात होणार आहे. मुंबईच्या लोअर परळ-वरळी भागात कंपनीचं पहिलं शोरूम आणि कार्यालय उभं राहणार आहे. बर्याच काळापासून भारतीय बाजारपेठेवर लक्ष असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांच्या या जगप्रसिद्ध ब्रँडने भारतातील आपलं पहिलं ऑफिस उभारण्यासाठी मुंबईतील या उच्चभ्रू परिसराची निवड केली आहे.
टेस्लानं यापूर्वीच बेंगळुरू इथं आपला उत्पादन प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली असून, तिथंच रजिस्टर्ड ऑफिस सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु नवीन माहितीनुसार, कंपनी मुंबईत आपलं रजिस्टर्ड ऑफिस सुरू करणार असून, बेंगळुरू हे टेस्लाचं भारतातील मुख्यालय असेल, तर मुंबईत त्यांचं क्षेत्रीय कार्यालय असेल.
मस्क यांनी टेस्ला भारतात प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यानंतर, फेब्रुवारी महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी अमेरिकेतील ही इलेक्ट्रिक वाहन कंपनी बेंगळुरू इथे आपला उत्पादन प्रकल्प स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
काही दिवसांपूर्वीच या कंपनीनं भारतातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून, त्यांनी कामकाजाची जबाबदारी स्वीकारली आहे.
भारतातील व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय नेमणुका करून टेस्ला इंडियाने आपल्या कामाला गती दिली असून, भारतातील कामाला वेग आला आहे. ही प्रगती पाहून उत्साह वाढत असून टेस्लाची पहिली कार भारतात दाखल करताना मस्क यांना पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत,’ असं टेस्ला क्लब इंडियानं एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बेंगळुरू इथं कंपनी म्हणून नोंदणी करून भारतात दाखल झाल्याची बातमी जगजाहीर झाल्यानंतर, मस्क यांनी १३ जानेवारी रोजी भारताच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक कार दाखल करण्याचं आपलं वचन आपण लवकरच पूर्ण करणार असल्याचं जाहीर केलं होतं.