तांबेंचा डाव; पटोलेंना घाव

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे अशी आतापर्यंत ओळख असलेले सत्यजीत तांबेनी शिक्षक पदवीधर निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जात अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्याक्षणापासून राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. भाजपने विशेतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत यांना आपल्याकडे खेचत थोरातांचा आणि काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला.

या सगळ्या प्रकरणात महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपल्यावरील जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. या प्रकरणावर अजून पर्यंत थोरातांकडुन काहीही स्पष्टीकरण न आल्याने थोरातांचीच तांबेना फूस असल्याची चर्चा आहे.

यातच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनी ” मी आधीच थोरातांना याबद्दल कल्पना दिली होती” असे सांगत पुन्हा थोरातांच्या कोर्टात चेंडू टोलवला. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या नाना पटोलेंनी देखील सत्यजीत तांबे प्रकरणाचे खापर बाळासाहेब थोरातांवर फोडले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील असलेल्या थोरात गटावर सध्या बॅकफूटवर जाण्याची नामुष्की ओढवली आहे.

सत्यजीत तांबेचे नेमके प्रकरण काय आहे?

नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकासआघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली गेली होती. यानंतरही सुधीर तांबेंनी आपला अर्ज दाखल केला नाही. दुसरीकडे सत्यजीत तांबेंनी याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला.

या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यांनी एबी फॉर्म दिला गेला होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. दरम्यान, त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये उमदेवारी जाहीर करण्यावर पेच निर्माण झाला होता.

तसेच भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. काँग्रेसला जोरदार धक्का देण्यासाठी भाजपने तयारी केली होती. मात्र, काँग्रेसने जोरदार सूत्र हलवित तांबे यांच्या घरात उमेदवारी राहिल याची काळजी घेतली. मात्र, तरीही भाजपने शेवटी काँग्रेसला धक्का दिलाच असेच सध्या म्हणावे लागेल.

यानंतर तांबे पिता पुत्रांवर काँग्रेसकडून शिस्त भंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. आणि या सगळ्या नामुष्कीच्या प्रकरणावर काँग्रेसमधून प्रदेशाध्यक्ष बदलाची जोरदार मागणी होऊ लागली आहे. विदर्भातील काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी ही मागणी केली आहे.

काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला होता, आपली हक्काची मते देखील काँग्रेसला न मिळू शकल्याने तेव्हा देखील नाना पटोलेंवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे भाजपचे सरकार सत्तेवर आले. या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे तब्बल ९ आमदार अनुपस्थित राहिल्याने पटोलेंचा पक्षावर होल्ड राहिला नाही अशी मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली.

तसेच अजुनपर्यंत काँग्रेसकडून या आमदारांवर कोणतीच कारवाई न करण्यात आल्याने कार्यकर्ते देखील नाराज आहेत. यांनी या सगळ्या गोष्टींसाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेच जबाबदार असून तातडीने प्रदेशाध्यक्ष बदलण्यात यावा अशी मागणी आता काँग्रेसमधूनच होत आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *