“माझा जीव घ्या पण मुलांना सोडून द्या”
म्यानमार मध्ये सध्या आणीबाणी लागू करण्यात आली आहे. म्यानमार मधील लष्कराने नेत्या आंग सान सू की आणि राष्ट्रपती विन म्यींट यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर तेथील परिस्थिती बिघडली आहे. जागोजागी आंदोलकांवर अत्याचार करण्यात येत आहे. शेकडो आंदोलनकर्त्यांना जेल मध्ये टाकण्यात आले आहे. दरम्यान पांढऱ्या वेशात हात पसरवून सैन्याला गोळीबार थांबवण्यासाठी विनवणी करणाऱ्या एका कॅथॉलिक ननचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होतोय. त्या फोटो नंतर कॅथॉलिक ननचं प्रचंड कौतुक केलं जातंय.
आधीचा ब्रह्मदेश म्हणजेच आत्ताचा म्यानमार. एक असा देश जो आधी अखंड भारताचा भाग होता, भारताप्रमाणंच इंग्रजांनी म्यानमारवर राज्य केलं. इंग्रज गेल्यानंतर काही काळ स्वातंत्र्याचा सूर्य देखील उगवला पण तो फार काळ टिकला नाही. लवकरच सैन्यानं देशावर ताबा घेतला आणि तब्बल २६ वर्ष निर्विवाद सत्ता गाजवली. आंग सान सू की (Aung San Suu Kyi) नावाची महिला पुढं आली आणि तिने मोठ्या धाडसानं म्यानमारच्या नागरिकांची सैन्याच्या जोखडीतून नागरिकांची सुटका केली आणि देशात पुन्हा संविधान लागू केलं.
म्यानमारच्या घटनेने सरकार उलथून टाकण्याची ताकद सैन्याकडे दिली आहे. आणि हेच म्यानमारच्या अंगलटी येत आहे. सगळं काही सुरळीत चालू असताना एक दिवस लोक सकाळी उठले, तर कळालं सत्तापालट झालीये. सैन्याचं पुन्हा राज्य आलं आहे. ज्या टीव्हीवर लोकांनी ही बातमी पाहिली. त्या टीव्हीचा सिग्नलही काही वेळात गेला. सोशल मीडियावर काही काळ बातम्यांचा पूर आला, पण थोड्याच वेळात इंटरनेटही गायब झालं. खिडकीबाहेर पाहिलं तर रस्त्यावर सैन्याच्या तुकड्या दिसल्या. आता पुन्हा तो देश सैन्याच्या काळकोठडीत बंद झालाय.
सत्ता काबीज केलेल्या याच सैन्याविरोधात नागरिकांची आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलनामध्ये जवळपास २ हजार कामगार आणि विद्यार्थी संघटनांचा समावेश आहे. लोकशाही परत मिळवण्यासाठी म्यानमारमध्ये जोरदार निषेध सुरू आहेत. अश्रुगॅस, पाण्याच्या फवाऱ्याचा मारा, रबर बुलेट्स आणि बंदुकीच्या गोळ्यांचा वापर करून सैन्य आपल्या शक्तीचा वापर वाढवत आहेत. ८ मार्चला हेलमेट आणि होममेड शिल्ड्स घालून आंदोलक काचीन राज्याची राजधानी मायटकीइनाच्या रस्त्यावर उतरले. आता कोणतंही आंदोलन थांबवण्यासाठी सत्ताधारी बळाचा वापर तर करणारच. पोलिसांनी गोळीबार करायला सुरवात केली आणि आंदोलनात असणारी मुले सैरावैरा पळू लागली. याचसाठी त्या मुलांना सोडून देण्याची मागणी करणाऱ्या ननचा फोटो वायरल झाला. सशस्त्र पोलिस अधिकाऱ्यांच्या गटापुढे गुडघे टेकून सिस्टर अॅन रोझ नु ताँग यांनी “माझा जीव घ्या पण मुलांना सोडून द्या” अशी विनंती केलीये.
एका ननने उत्तर म्यानमार शहरातील पोलिसांसमोर गुडघे टेकले आणि मागच्या महिन्याच्या सैन्याच्या विरोधात आंदोलन करणारे निदर्शकांना गोळीबार थांबवावा अशी विनंती केली.