Tuesday, October 4, 2022
Homeराजकीयशिवसेनेवर वाईट वेळ आली ?, उद्धव ठाकरेंचा बाप काढणाऱ्यांना शिवसेनेत एन्ट्री कशासाठी...

शिवसेनेवर वाईट वेळ आली ?, उद्धव ठाकरेंचा बाप काढणाऱ्यांना शिवसेनेत एन्ट्री कशासाठी ???

आंबेडकरी विचारसरणीचा बुलंद आवाज तसेच शाहू फुले आंबेडकर विचार वाड्यात खेड्यात आणि तांड्यात पसवणाऱ्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत महागळती सुरू असताना सुषमा अंधारे यांनी उध्दव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

उजव्या विचारसरणीवर तसेच कट्टर धार्मिक पंथीयांवर हल्लाबोल करणाऱ्या नेत्या म्हणून सुषमा अंधारे यांना ओळखलं जातं. त्या अनेकदा जाहीर भाषणांमधून उजव्या विचारसरणीचं व्यासपीठ असलेल्या आरएसएस तसेच बजरंग दल यांसारख्या संघटनांवर तुटून पडायच्या. हिंदुत्वाचा थाट धरणाऱ्या शिवसेनेवर देखील सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीच्या प्रचार सभांमध्ये सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावरही तोफ डागली होती. त्यावेळी त्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक देखील होत्या. जितेंद्र आव्हाडांसाठी त्यांनी सभा देखील घेतली होती. मात्र, आता त्यांनी शिवबंधन हाती बांधलं आहे.

उद्धव ठाकरे यांचे जुने शिलेदार साथ सोडून गेले असल्याने त्यांच्यासारख्या संयमी नेतृत्वाला साथ द्यायला हवी, अशा विचाराने मी शिवसेनेत प्रवेश करतेय, शिवसेना पक्षप्रवेशामुळे मला काहीतरी मिळेल, अशी माझी अपेक्षा नाही, असं सुषमा अंधारे सांगतात. त्यामुळे त्यांना येत्या काळात उमेदवारी मिळेल का?, असा विक्षिप्त सवाल उपस्थित होतोय.

शिवसेनेकडून आता काही अपेक्षाही नाही. आता माझ्या डोक्यात फक्त एकच आहे की, शिवसेनेला मी काय देऊ शकते?, चांद्यापासून बांद्यापर्यंत जो शिवसैनिक भरकटला आहे. या शिवसैनिकांमध्ये मी कशी एक नवी उमेद जागी करु शकते, हे काम मला करायचं आहे, हे माझ्यापुढचं आव्हान आल्याच्या भावना सुषमा अंधारे यांनी व्यक्त केल्या आहेत.

सुषमा अंधारे आहेत तरी कोण?

सुषमा अंधारे यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात झाला. आधी एम ए , बीएड, पीएच डी तसेच लॉ अशा अनेक पदव्या त्यांच्या नावावर आहेत. पेशाने त्या वकील असून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राच्या त्या व्याख्यात्या देखील आहेत. त्याचबरोबर लिखाणात देखील त्याचा वरचश्मा आहे.

उत्तम भाषण शैलीमुळे त्याची भाषण चांगलीच गाजली. पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक तसेच भटक्या विमुक्त आणि आंबेडकरी चळवळीत त्यांचा सक्रिय वाटा आहे. अनेक मोठं मोठ्या आंदोलनाद्वारे त्यांनी प्रशासनाला खडवडून जागं केलं. तर वेळोवेळी त्यांनी उजव्या विचारसरणीवर टीकास्त्र सोडलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस ही फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, असं मानलं जातं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमी भाषणामधून याचा उल्लेख करतात. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जातीयसमिकरण बसवण्यासाठी सुषमा अंधारे हे प्रचलित नाव. मात्र, राष्ट्रवादीने मिटकरींना मोठं करून सुषमा अंधारे यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा होती.

सुषमा अंधारे यांची राजकीय वाटचाल-

कोरेगाव भीमा प्रकरणात मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या फिर्याददार होत्या. गणराज्य संघाच्या त्या प्रमुख आहेत, या संघामार्फत संविधानीक हक्कांबाबत जनजागृती करण्याचं काम अंधारे करतात. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला.

विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या गणराज्य संघाचा राष्ट्रवादीला पाठींबा दिला. मात्र, गणित हुकलं. विधान परिषदतील त्यांचं तिकीट हुकलं. अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेवर संधी दिली. त्यानंतर राज्यपाल नियुक्त खासदारांच्या यादीत नाव येईल, अशी अपेक्षा सुषमा अंधारे यांना होती. मात्र, त्यावेळी देखील त्याच्या पदरी निराशा पडली.मात्र, आता शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने नवं समीकरण येत्या काळात दिसून येऊ शकतं.

अंधारे यांना पक्षात घेण्याची वेळ शिवसेनेवर का आली?

शिवसेनेशी आघाडी ही सेक्युलर पक्षांची राजकीय गरज आहे. पण ती फुले-शाहू-आंबेडकरवादी कधीपासून झाली?, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे उपस्थित करतात.

थेट उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल करणाऱ्या व्यक्तीला पक्षात फक्त गरज म्हणून स्थान दिलं असेल, अशी चर्चा आहे. सुषमा अंधारे यांची वैचारिक बैठक वेगळी आहे. त्यामुळे जाहीर सभांमध्ये गराजणारी तोफ म्हणून शिवसेनेने त्यांना संधी दिली असावी.

स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतराला विरोध केला होता. शिवसेनेने नामांतराला विरोध केला असूनही आंबेडकरवादी व्यक्ती शिवसेनेत जाते, हे विशेष आहे. शेवटी राजकारणात चूक आणि बरोबर काही नसतं, असं म्हणतात. त्यामुळे येत्या काळात अंधारे यांना उमेदवारी दिली जाणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मागील काही दिवसांपासून सचीन अहिर यांच्या माध्यमातून सुषमा अंधारे शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत चर्चा होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्या शिवसेनेत प्रवेश करणार, हे जवळजवळ निश्चित झालं होतं. त्यानंतर आता उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

हे ही वाचा की-

ठाकरेंच्या सामनाला उत्तर म्हणून राणेंनी ‘प्रहार’ची सुरुवात केली…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments