वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच !

देवेंद्र फडणवीस
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार हे विदर्भातील पहिले मुख्यमंत्री ठरले. यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारमध्ये कन्नमवारांनी मंत्री म्हणून कारभार पहिला. पुढे यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाले. मात्र, जाताना त्यांनी आपला उत्तराधिकारी घोषित केला.

तेव्हा कॉंग्रेसमध्ये मावळत्या मुख्यमंत्र्याने नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची पद्धत होती. त्यामुळे नवीन मुख्यमंत्री ठरविण्याचा अधिकार कॉंग्रेस कमिटीने यशवंतरावांना दिला होता. त्यानुसार मारोतराव कन्नमवार यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.

मारोतराव कन्नमवार कारकीर्द

मारोतराव कन्नमवार यांचा जन्म १० जानेवारी १९०० ला चंद्रपूर मध्ये झाला. सामाजिक कार्यातून ते राजकीय चळवळीत उतरले. चंद्रपूरमधील मूळ सावली विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून ते विधान मंडळात पोहोचले. पण महाराष्ट्राच्या नाही तर मध्य प्रदेशच्या.

कारण तेव्हा त्यांचा मतदारसंघ मध्यप्रदेश राज्यात येत होता. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मध्यप्रदेशमधील हा भाग महाराष्ट्रात आला. कन्नमवार यांनी मध्यप्रदेशच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पहिले. विशेष म्हणजे, वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्त्यांमध्ये त्यांचाही समावेश होता.

तेव्हाच्या मध्यप्रदेश सरकारमध्ये मंत्री राहून, वेगळ्या विदर्भीची मागणी करून संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर राज्याची जडणघड करण्यासाठी कन्नमवार यांनी मेहनत घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी पूर्ण क्षमतेने राज्याचा गाडा हाकला.

आज कन्नमवार यांच्या आठवणींना उजाळा देण्याचे कारण म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेली तिहेरी भूमिका.

कधीकाळी वेगळ्या विदर्भाची मागणी, आता विदर्भाचे पालक

नुकतेच एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. तसेच नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

भाजपकडून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आजवर कैक आंदोलने झाली, ज्यात नितीन गडकरी, सुधीर मूनगंटीवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस हे देखील सामील झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गडकरींनी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले होते.

तर देवेंद्र फडणवीस यांनी शेगाव मधून ‘युवा जागर यात्रा’ काढत वेगळ्या विदर्भाची मागणी उचलून धरली होती.

२०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार आले आणि मारोतराव कन्नमवार, वंसतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्यानंतर फडणवीसांच्या रूपाने विदर्भाच्या वाट्याला मुख्यमंत्री पद आले.

पण वेगळ्या विदर्भाच्या मागणीच्या सहानुभूतीवर राजकारण करणाऱ्या फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याचा सर्वसमावेशक विकास अजेंड्यावर ठेवून वाटचाल केली. त्यामुळेच विरोधक अधूनमधून त्यांच्यावर यावरून निशाणा साधतात. मात्र, ‘वेगळा विदर्भ’ या मुद्द्यावर फडणवीसांचे मौन पाहायला मिळते.

विदर्भाचे विरोधी पक्ष नेते

प्रभा राव आणि प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने विदर्भाला विरोधी पक्ष नेते पद मिळाले. त्यांनतर फडणवीसांच्या काळात कॉंग्रेसने विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते पदी बसविले. त्यावेळी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते अशी दोन्ही महत्वाची पदे विदर्भाकडे गेली.

त्यानंतर २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने फडणवीसांना विरोधी पक्ष नेते पदावर समाधान मानवे लागले. अशारीतीने विदर्भाकडे चौथ्यांदा विरोधी पक्ष नेते पद आले. अनुक्रमे प्रभा राव, प्रतिभा पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची विरोधी बाकावरची कारकीर्द वादळी ठरली.

फडणवीसांचे मुख्यमंत्री पद विदर्भामुळे हुकले ?

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २८८ पैकी १२२ जागा मिळाल्या. त्यापैकी ४३ जागा एकट्या विदर्भातून मिळाल्या. पण हेच समीकरण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिसले नाही. विदर्भातील ६२ पैकी केवळ २८ जागा राखण्यात भाजपला यश आले. २०१४ च्या तुलनेत भाजपने १५ जागा गमावल्या.

तसेच पश्चिम महाराष्ट्रातही भाजपला मोठा धक्का बसला. २०१९ ला भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, याला विदर्भात आलेले अपयश हे देखील महत्वाचे कारण आहे. एकंदरीतच फडणवीस यांचा रथ रोकण्यात पश्चिम महाराष्ट्रासोबतच विदर्भाचा देखील हात आहे, असेच म्हणावे लागेल.

राजकारणात टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या भूमिका स्वीकाराव्या लागतात. तसेच फडणवीसांनी केले. वेगळा विदर्भ मागणीच्या सहानुभूतीवर राजकारण करूनही मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या विकास कामांसाठी स्वतःला झोकून दिले. मात्र, फडणवीसांच्या यश अपयशात ‘विदर्भ फॅक्टर’ महत्वाचा असल्याचे दिसून येते.

आणखी वाचा :

२०१४ पूर्वी राष्ट्रीय महामार्ग नव्हते ; आता रेल्वेही आली, मुंडेंची स्वप्नपुर्ती झाली…


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *