…तर सुनिल गावस्कर आज क्रिकेटर नाही, मच्छिमार असले असते; वाचा जन्माचा भन्नाट किस्सा!

साल होतं 1971… क्रिकेटच्या दुनियेतील राक्षस टीम म्हटल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजसोबत भारताचा मुकाबला होणार होता. भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये 5 टेस्ट सामन्याची मालिका आयोजित करण्यात आली होती. यातील पोर्ट ऑफ स्पेनच्या ओव्हल मैदानावर मालिकेतील दुसरा सामना खेळवला गेला.
पहिला सामना ड्राॅ झाल्याने भारताला दुसऱ्या सामन्यात चांगली खेळी करत सामना जिंकण्याची गरज होती. त्यावेळी भारतीय संघात एक बदल करण्यात आला. 5 फूट 5 इंच उंचीचा एक सलामीवीर फलंदाजाला संघात स्थान देण्यात आलं. त्या खेळाडूचं नाव होतं, सुनिल मनोहर गावस्कर…
माईक फिन्डले, व्ही होल्डर, जाॅक नोरेगा आणि जी शिलिंगफोर्ट सारख्या रांगड्या वेस्ट इंडिज गोलंदाजांसमोर टिकणं म्हणजे अवघडच गोष्ट होती. भारतासाठी सलामीला आलेल्या अशोक मिनकंडसोबत एक तरूण मुलगा मैदानात आला आणि मैदानात चौफेर फटकेबाजी करत पहिल्याच सामन्यातील दोन्ही डावात अर्धशतकं झळकावली.
सुनील गावस्कर वयाच्या 71 व्या वर्षीही क्रिकेट जगतात सक्रिय आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पुर्ण करणारे ते पहिले फलंदाज आहेत. गावस्कर यांनी 7 मार्च 1987 रोजी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये 10000 धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याने या सामन्यात 63 धावांची धमाकेदार खेळी केली होती.
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 33 शतके झळकावणारे ते पहिले फलंदाज ठरले. जागतिक क्रिकेटमध्ये सुनिल गावस्कर नावाचं एक वादळ निर्माण झालं होतं. पुढे जाऊन लिटल मास्टरचे रेकाॅर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने तोडले. मात्र,काही रेकाॅर्ड सुनिल गावस्कर यांच्या नावावर आजही कायम आहेत.
10 जुलै 1949 रोजी मुंबईत जन्मलेल्या सुनिल गावस्कर यांनी ‘Sunny Days’ नावाची ऑटोबायोग्राफी लिहिली. त्यात सुनिल गावस्कर यांनी त्यांच्या जन्माचा भन्नाट किस्सा सांगितला.
लिटल मास्टरच्या जन्माचा किस्सा-
सुनिल गावस्कर यांचा जन्म मुंबईत झाला. “मी कधीच क्रिकेटर झालो नसतो आणि हे पुस्तक लिहिलं गेलं नसतं, जर माझ्या आयुष्यात नारायण मसुरकर नसते”, असं गावस्कर म्हणतात. माझ्या जन्माच्यावेळी नारायण मसुरकर मला पाहण्यासाठी आले होते.
नारायण मसुरकर यांनी मला जवळ घेतलं असताना त्यांनी माझ्या कानावर जन्मखून पाहिली. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा हाॅस्पिटलला आले. त्यावेळी त्यांनी हातात उचलेल्या बाळाच्या कानात जन्मखून नव्हती. त्यावेळी मला शोधण्यासाठी पुर्ण हाॅस्पिटलमध्ये गोंधळ उडाला.
त्यानंतर पुर्ण रूग्णालयात शोधमोहिम सुरू झाली. रूग्णालयातील मुलांना तपासण्यात आलं. त्यावेळी मी एका मच्छिमार असलेल्या बाईच्या शेजारी मिळालो. नर्सच्या नजरचुकीमुळे तिने मला तिथे झोपवलं होतं, असं गावस्कर लिहितात.
मुलांना आंघोळ घालताना कदाचित मी बदललो असावा. त्या दिवशी काकांनी लक्षात घेतलं नसतं तर आज मी मच्छीमार झालो असतो, असंही सुनिल गावस्कर म्हणतात.
ऑटोग्राफ देता देता प्रेमात पडले…
गावस्कर यांच्या पत्नी मार्शलीन मल्होत्रा या कानपूरच्या रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचा कानपूरमध्ये चामड्याचा व्यवसाय होता. मार्शल आणि गावस्कर यांची पहिली भेट 1973 मध्ये झाली होती.
मार्शल दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेत होत्या. एकेदिवशी सहज त्या स्टेडियममध्ये मॅच पहायला आल्या. स्टेडियमच्या स्टुडंट गॅलरीत मार्शलीनची नजर गावस्करांवर पडली आणि तेव्हा त्यांनी लगेच जाऊन सुनिल गावस्कर यांना ऑटोग्राफ मागितला.
मग काय… ऑटोग्राफ देता देता गावस्कर प्रेमात पडले. पहिल्याच भेटीत दोघांची हृदयभेट झाली. सुनिल गावस्कर यांनी मार्शलीन यांच्याबद्दल माहिती काढली. त्यावेळी त्यांना कळालं की, मार्शलीन कानपूरमध्ये राहतात.
गावस्कर कानपूरला त्यांच्या मित्राच्या घरी राहिले आणि मार्शलीनच्या घराची माहिती मिळताच ते एखाद्या फिल्मी हिरोसारखे चक्कर मारायला सुरूवात केली. कानपूर कसोटीदरम्यान मार्शलीनच्या संपूर्ण कुटुंबाला गावस्कर यांनी आमंत्रित केलं.
सामना संपल्यावर गावस्कर यांनी मार्शलीन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत मनातील गोष्ट मार्शलीनला सांगितली. लिटिल मास्टरने एकदा बोलल्यानंतरच मार्शलच्या कुटुंबाने या नात्याला सहमती दिली. 13 सप्टेंबर 1974 रोजी गावस्कर आणि मार्शलीनचे लग्न झालं.
हे ही वाचा की-
सोन्याची लंका पैशांसाठी तरसली, राष्ट्रपतींच्या घरावर जमावाचा कब्जा; श्रीलंकेत नेमकं चाललंय काय?