पित्याच्या मृत्यूने खचलेल्या युवा पत्रकाराची आत्महत्या

सोलापूर: महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. रुग्णांना बेड,रेमडेसिव्हर इंजेक्शन, ऑक्सिजन मिळत नसल्याने प्रचंड भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने, पत्रकार प्रकाश जाधव यांनी आत्महत्या केली आहे.
प्रकाश जाधव यांच्या वडिलांवर गुरुवारी अंत्यसंस्कार करायचे होते, मात्र त्या आधीच पित्याच्या मृत्यूने खचलेल्या प्रकाशने स्वतःची जीवनयात्रा त्यांच्या अगोदर संपवली. प्रकाश जाधव आणि त्यांच्या घरातील सगळ्यांनाच कोरोनाची लागण झाली होती. नैराश्यातून वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी या पत्रकाराने हाताची नस कापून राहत्या घरी आत्महत्या केलीये. संगमेश्वर महाविद्यालयात पत्रकारितेचे शिक्षण घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले प्रकाश जाधव यांनी अनेक दैनिकांत काम केले होते. युवा पत्रकाराने असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नैराश्यातून आत्महत्या
प्रकाशची आई आणि वहिनी कोरोना पॉसिटीव्ह असल्याने त्यांच्यावर सोलापुरातील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. घरातील सगळ्याच व्यक्तींना कोरोना झाल्यामुळे प्रकाश आणि त्यांचे भाऊ सतीश हे दोघंही विलगीकरणात राहत होते या सगळया घटनेमुळे खचून गेलेल्या प्रकाशने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचं म्हटलं जात आहे. प्रकाश याने डाव्या हाताची नस कापून घेतली, त्याला बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
त्याचा भाऊ सतीश जाधव हा सोलापूर शहर पोलिस दलात कार्यरत आहे. प्रकाश जाधव सारख्या हरहुन्नरी युवा पत्रकाराने आत्महत्या केल्याने सोलापुरातील पत्रकारांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.