श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई: टीम इंडियाचा क्रिकेटपटू आणि आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्या खांद्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्रेयस अय्यरने त्याच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतरचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. ‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि सिंहाच्या काळजाचा निश्चय करून मी लवकरच पुनरागमन करेन, तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद,’ असं श्रेयस अय्यर म्हणाला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात झालेल्या पहिल्या वनडेमध्ये फिल्डिंग कताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. फोर अडवताना तो खांद्यावर पडला होता. दुखापत गंभीर असल्यामुळे अय्यर सीरिजमधून बाहेर झाला होता. डॉक्टरांच्या तपासणीनंतर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचं समोर आलं.
श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्सचं झालं आहे. ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या मोसमासाठी श्रेयस अय्यर उपलब्ध नसेल. श्रेयस अय्यरच्याऐवजी ऋषभ पंतकडे दिल्लीचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
शस्त्रक्रियेनंतर श्रेयस अय्यर कमीत कमी चार ते पाच महिने क्रिकेटपासून लांब राहू शकतो, त्यामुळे फक्त आयपीएलच नाही तर त्याला टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातूनही मुकावं लागू शकतं. सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध टी-२० सीरिज खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. या सीरिजमध्येही श्रेयस अय्यरच्या खेळण्यावर शंका आहे.