प्रोफेसर जातीने ‘महार’ आहे म्हणून विद्यार्थी आंबेडकरांच्या लेक्चरला यायचे नाही…

बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या शेवटच्या कालखंडातील सामाजिक व राजकीय इतिहासात प्रामुख्याने घ्यावे लागेल. अस्पृश्यांचा प्रश्न हा एक राष्ट्रीय प्रश्न होता आणि तो सोडविण्यासाठी त्यांनी आपले सबंध आयुष्य वेचले. ते स्वतः अस्पृश्याच्या वागणुकीस बळी पडले. ते उच्चशिक्षित असूनही त्यांना शेवटपर्यंत समाजाने स्वीकारले नाही. लंडनमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास पूर्ण करून आंबेडकर मुंबईत येताच संभाजी वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करण्याचा निश्चय केला. परंतु, “मी अजून काहीही केलेले नाही तेव्हा सत्कार कशाकरता?” असे सांगून आंबेडकरांनी समारंभास हजर राहण्यास नकार दिला.
बडोदा सरकारच्या कराराप्रमाणे आंबेडकरांना बडोद्यास जाणे भाग होते. परंतु त्यांच्याजवळ पैसा नव्हता एवढ्यात समुद्रात बोटी सोबत बुडालेल्या सामानाची नुकसान भरपाई म्हणून थॉमस कुक कंपनीने त्यांना काही पैसे दिले होते. ऐन वेळेवर प्राप्त झालेल्या या द्रव्याचा आंबेडकरांना आनंद झाला. या पैशातून पत्नीला घर खर्चासाठी काही पैसे देऊन ते सप्टेंबर मध्ये बडोद्यास रवाना झाले. कराराप्रमाणे आंबेडकर यांना दहा वर्षे नोकरी करायची होती. मोठा अधिकारी स्टेशनवर आला की त्याला घ्यायला दरबारचे अनेक लोक हजर होत असायचे. परंतु आंबेडकर महार म्हणून स्टेशनवर त्यांना घ्यायला कुणीही आले नाही.
बडोदा शहरात आपल्या भावाबरोबर फिरून आंबेडकरांनी खानावळी अथवा वस्तीगृह शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु जात सांगतात प्रत्येकाने त्यांना हाकलून लावले. शेवटी ते एका पारशांच्या खानावळीत जात चोरून राहिले. परंतु थोड्याच दिवसात ही गोष्ट सर्वत्र कळली आणि पारशी लोक लाठ्या-काठ्या घेऊन खानावळीत आंबेडकरांना मारायला आली होती. आंबेडकरांना त्यांनी जात विचारली व ताबडतोब खानावळ खाली करण्यास बजावले.
आंबेडकरांना अर्थमंत्री नेमावे अशी महाराजांची इच्छा होती. परंतु निरनिराळ्या विभागांमधील प्रशासनाचा अनुभव असावा म्हणून प्रथम त्यांना महाराजांचे मिलिटरी सचिव म्हणून नेमण्यात आले. एवढ्या उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्याचं निव्वळ तो अस्पृश्य आहे म्हणून तेथील कारकून आणि शिपाई त्यांच्याकडे दुरून फाईल फेकत असत. ते उठून गेल्यानंतर खालची चटाई देखील नेऊन स्वच्छ करीत. त्यांना पिण्याकरिता ऑफिसमध्ये ही पाणी मिळत नसायचं. रिकाम्या वेळात आंबेडकर वाचनालयात जाऊन बसत आणि स्वतःच्या मनाचा विरंगुळा देत असायचे.
अशा अपमानजनक स्थितीत काम करीत असतानाच आंबेडकरांना पारशाच्या खानावळीतुन बाहेर काढण्यात आले. कोणताही हिंदू व मुसलमान त्यांना जागा देईना. त्यांनी महाराजांच्या कानावर एका पत्राद्वारे ही गोष्ट घातली. महाराजांनी दिवाणाला व्यवस्था करण्यास सांगितले. परंतु दिवाणाने आपली असमर्थता प्रकट केली. उपाशीपोटी असलेले आंबेडकर भटकत-भटकत ते एका झाडाखाली बसले आणि ढसाढसा रडू लागले. “हिंदू समाजात अस्पृश्य कितीही उच्चविद्याविभूषित असला तरी तो अन्य जातीच्या अगदी निकृष्ट माणसापेक्षा देखील कनिष्ठ समजला जातो.”
त्यानंतर अत्यंत विषण्ण मनाने आणि निराश होऊन डॉ. आंबेडकर नोव्हेंबर १९१७ मुंबईस परतले. केळकर गुरुजी यांच्यामार्फत त्यांनी संपूर्ण हकीकत सयाजीराव यांना कळवली. जोशी नावाचे केळूसकर यांचे एक मित्र बडोद्याला राहत होते. त्यांनी केळुसकर यांना, “आपण आंबेडकरांना जागा द्यायला तयार आहोत व पेईंग गेस्ट म्हणून ते माझ्याकडे राहतील” असे कळविले. पुन्हा आंबेडकर जेव्हा बडोदा स्टेशनवर पोहोचले तेव्हा प्राध्यापक महाशय कडून आलेली चिठी त्यांना मिळाली. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, “माझ्या पत्नीचा आपणास आमच्याकडे राहण्यास.” असे वाचून स्टेशन वरूनच आंबेडकरांनी बडोदा राज्याचा निरोप घेतला होता.
अस्पृश्यांच्या दोन परिषदा १९१७ च्या सुमारास मुंबईत स्पृश्यांनी आयोजित केल्या होत्या. डॉ. आंबेडकरांनी स्पृश्यांनी आयोजित केलेल्या कोणत्याच परिषदेत भाग घेतला नाही. त्यांची स्वतःची आर्थिक स्थिती डळमळीत होती. स्वतःच्या पायावर उभे राहणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य होते. तोपर्यंत काहीतरी उद्योग करावा म्हणून त्यांनी एका पारशी गृहस्थाच्या मध्यस्थीने दोन विद्यार्थ्यांच्या शिकवण्या स्वीकारल्या. त्यानंतर शेअर बाजारातील दलालांना सल्ला देणारी एक कंपनी देखील त्यांनी काढली होती. परंतु या कंपनीचा मालक अस्पृश्य आहे हे कळताच तिकडे कोणीही फिरकत नसायचं. काही दिवस आंबेडकरांनी एका पारशी गृहस्थांच्या हिशेब तपासणीसाचे काम केले.
याच सुमारास त्यांनी बट्रांड रसेल यांच्या ‘रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी’ या पुस्तकावर विवेचक परीक्षण लिहून, ‘इंडियन इकॉनोमिक सोसायटी’ मासिकात प्रसिद्ध केले. त्यांचा ‘कास्ट इन इंडिया’ हा निबंध पुनर्मुद्रित करण्यात आला. हा लेख इतका मौलिक समजला गेला की, ‘दि अमेरिकन जर्नल ऑफ सोशलॉजी’च्या संपादकांनी त्यामधील पुष्कळसा भाग ‘वर्ड्स बेस्ट लिटरेचर ऑफ द मंथ’ या मासिकात प्रकाशित केला. शेतीच्या एकत्रीकरणापूर्वी औद्योगिकीकरण होणे कसे आवश्यक आहे हे सांगणारा स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देयर रेमेडीज हा निबंध ही त्याच सुमारास प्रसिद्ध झाला होता.
याच काळात मुंबई येथील सिडनहॅम कॉलेजमध्ये एका प्राध्यापकाची जागा रिकामी झाली. आंबेडकरांना आर्थिक दृष्ट्या अजूनही स्थैर्य लाभले नव्हते त्यामुळे त्यांनी या जागेकरिता अर्ज पाठवला. ११ उमेदवारांमध्ये आर एम जोशी यांना नेमावी असे प्राचार्य ऍन्स्टी यांचे मत होते. परंतु त्यांनी इंग्लंडहून जेंव्हा, प्राचार्य एडविन कॅनन यांचे मत विचारले. तेव्हा कॅनन यांनी म्हटले की, “विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी आंबेडकर आपल्या जवळची सर्व सामग्री त्यांच्या ओततील.” अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या अर्जावर लिहिले की त्यांनी जे ज्ञान संपादन केले ते महार असूनही त्यांनी मिळवले यावरून त्यांच्यात असाधारण गुण असावेत हे उघड आहे. त्यांची वागणूक सभ्य व व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. सिडनहॅम कॉलेजमध्ये पोलिटिकल इकॉनॉमी राजकीय अर्थशास्त्र या विषयाचा प्राध्यापक म्हणून डॉ. आंबेडकर यांची निवड करण्यात आली. साडेचारशे रुपये पगारावर तात्पुरत्या पदावर एका वर्षाकरिता सरकारने त्यांची नेमणूक केली.
आंबेडकर अस्पृश्य आहेत हे कळताच, पहिल्यापासून विद्यार्थी त्यांच्या वर्गात फारसा रस घेत नसत. परंतु त्यांच्या शिकविण्याच्या शैलीची जशीजशी ख्याती पसरू लागली. तसतशी विद्यार्थ्यांची रांग त्यांच्या वर्गात वाढू लागली. आंबेडकरांचा सखोल अभ्यास, सर्वांगीण विवेचन आणि विचार प्रवर्तक स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना खिळवून ठेवू लागले. अन्य अनेक कॉलेजांच्या विद्यार्थी आंबेडकरांची परवानगी मिळवून त्यांच्या वर्गात त्यांचे व्याख्यान ऐकण्यास बसू लागले. आंबेडकर लवकरच आपल्या शिकवण्याच्या शैलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले. आंबेडकरांचा विद्यार्थ्यांवरती जबरदस्त धाक होता त्यामुळे कोणीही त्यांची गंमत वा टिंगल करण्याचा धजत नसे.
आंबेडकरांच्या दृष्टीने आधुनिक परीक्षा पद्धती योग्य नव्हती. विद्यार्थी वर्गात काय शिकतो यावरच त्यांचे मूल्यमापन व्हायला हवे. तोंडी परीक्षाना लेखी परीक्षापेक्षा जास्त महत्त्व द्यायला हवे. रामचंद्र बनौधा आंबेडकर चरित्राचे लेखक यांनी, जेंव्हा डॉक्टर आंबेडकरांना परीक्षक म्हणून कसे कार्य करीत असायचे, याबद्दल विचारणा केली तेव्हा ते म्हणाले,
“उत्तरपत्रिका तपासण्याचे माझे स्वतःचे काही निकष आहेत. मी पन्नास टक्के मार्क उत्तरातील माहितीसाठी व ५० टक्के उत्तराच्या रितीसाठी राखून ठेवतो. रिती मध्ये भाषाशैली व मांडण्याची पद्धती यांचा समावेश होतो. शक्यतो प्रत्येक विद्यार्थ्यास उत्तीर्ण करणे हा माझा हेतू असतो. अर्थात साधारणपणे जास्तीत जास्त उत्तरपत्रिकांना ३३ टक्के मार्क देण्यात येतात. ज्या उत्तरपत्रिका ३३ टक्के मार्क दिल्यानंतर चांगल्या वाटल्या त्यांना ४५१ टक्क्यांपर्यंत मार्क मिळत. मात्र त्यानंतर फार कडक तपासणी करण्यात येई. ६० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी फारच थोडे असत. कारण अशा उत्तर पत्रिका फारच कडकपणे तपासल्या जात.”
एक प्राध्यापक म्हणून आंबेडकर अशी अलौकिक पद्धत अवलंबित असायचे.