कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यात कठोर निर्बंध आवश्यक; शरद पवारांचं जनतेला हे आवाहन

मुंबई: करोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधासंदर्भात बोलताना फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रामध्ये पाच एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांवरुन दुकानदार, व्यापारी आणि राजकीय नेत्यांनी आक्षेप नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला असून या कठीण प्रसंगामध्ये परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्रातील जनता सरकारच्या प्रयत्नांच्या पाठीशी उभी राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
राज्यातील वैद्यकीय स्टाफ अहोरात्र झटत असून परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत, याचा दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारचा ही हाच सूर आहे. केंद्र सरकार राज्याला सहकार्य करण्यासाठी तत्पर आहे. मी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी केंद्र सरकार संपूर्ण पणे महाराष्ट्राच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले.
कामगार, शेतकरी, व्यापारी , सर्वसामान्य सर्वांनाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, कित्येकांना आर्थिक झळ बसत आहे. नव्या निर्बंधांसंदर्भात दुकानदार, व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचा उल्लेख पवारांनी केला. तसेच नाशवंत भाजीपाल्याचं काय करायचं असा प्रश्न शेतकरी आणि व्यापारी वर्गापुढे आहे याचीही जाणीव आपल्याला असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. परंतु अनेक समस्या असतानासुद्धा आपण या परिस्थितीला आपण धैर्याने सामोरं गेलं पाहिजे, याला पर्याय नाही. समाजातील प्रत्येक घटकाला माझी विनंती आहे आपण वास्तव स्विकारायला हवं. जनतेच्या जगण्याच्या दृष्टीने राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे , असंही पवार यांनी म्हटलं आहे.
नेते, प्रसारमाध्यमे, सार्वजनिक क्षेत्रातील काम करणाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा. या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि समाजातील सर्व घटक इतर साऱ्या गोष्टी बाजूला ठेऊन एकत्र येतील असा विश्वास मला आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.