राज्यात १० दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा-राजेश टोपे
मुंबई: राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर लसीकरण हा पर्याय असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच लसीचे जास्तीचे डोस राज्यात पुरवले जावे या मागणीसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेतली. राज्य सरकारने केंद्राकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यात भारत बायोटेकचं तंत्रज्ञान हाफकिनलाही मिळावं, लसीकरणासाठी १०० बेडच्या रुग्णालयाची जी जाचक अट घातली आहे, ती रद्द करण्यात यावी अशा मागण्यांचा समावेश होतो.
राज्य सरकारने केंद्राकडे एक महत्वाची मागणी केली आहे. त्यात भारत बायोटेकच्या लसीचं तंत्रज्ञान महाराष्ट्राला देण्यात यावं. महाराष्ट्र सरकार त्याचा वापर करुन हाफकिनकडून लस निर्मिती करेल. अथवा महाराष्ट्र सरकारच्या सर्व संसाधनांचा वापर करुन केंद्रानं सर्व पुरवठा करावा, आम्ही फक्त ‘फिल अँड फिनिश’ करुन ते केंद्राला देण्यात येईल. या मागणीला पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. ही मागणी मान्य झाल्यास या द्वारे जे उत्पादन होईल त्यातील २५ टक्के वाटा महाराष्ट्राला देण्याची अट घातली जाईल, असंही टोपे म्हणाले.
सरकारनं लसीकरण केंद्रासाठी १०० बेडच्या रुग्णालयाची जी जाचक अट घातली आहे, ती रद्द करावी. ५० बेड किंवा २५ बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयांनाही परवानगी मिळावी. ज्या ठिकाणी लस साठवून ठेवण्याची यंत्रणा, कोल्ड स्टोरेज असेल अशा रुग्णालयांना परवानगी मिळावी, अशी मागणी केल्याचंही टोपे यांनी सांगितलं.
८५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नसल्यानं अनेक अडचणी निर्माण होत आहेत. राज्यात १ लाख ३८ हजार चाचण्या रोज होत आहेत. टेस्टची संख्या वाढवू, लॅब्स वाढवू, आरटीपीसीआर टेस्टिंग वाढवू, असं टोपे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४५ वर्षांवरील सर्वांनाच सरसकट लस देण्याची सूचना केंद्र सरकारला केल्याचंही टोपे यांनी सांगितलं. केंद्र सरकारने महाराष्ट्राला दर आठवड्याला २० लाख डोस देणं अपेक्षित आहे. आता आपल्याकडे फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक असल्याचंही टोपे यांनी सांगितलंय.