कुठं आमनेसामने तर कुठं वेगळ्या पक्षात राहून पती-पत्नी एकत्र : राजकारण अनंत शक्यतांचा खेळ !

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

बघता बघता सुषमा अंधारे शिवसेनेत आल्या, आंबेडकरी चळवळीतून हिंदुत्वादी संघटनेत मिसळसल्या आणि शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मूळच्या आक्रमक असणाऱ्या सुषमा अंधारे शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेत आल्यानं त्यांच्या वाणीला आणखीच धार आल्याचं पाहायला मिळतंय.

दसरा मेळावा असो की प्रबोधन यात्रा.. जाहीर सभा असो की पत्रकार परिषदा.. शिंदे गटावर सुषमा अंधारे अक्षरशः तुटून पडतात. जहरी टीका करण्यात त्या माहीर असल्यानं शिंदे गटाच्या नेत्यांना त्यांची टीका झोंबेते.

सुषमा अंधारेंकडून टीका होताच शिंदे गटातील नेते त्यांच्यावर तुटून पडतात. दोन्ही गटातील नेत्यांची आगपाखड आता नित्याचीच झालीय.

दरम्यान, शिंदे गटानं सुषमा अंधारे प्रकरणावर जालीम उपाय शोधलाय का ? असा खडा होतोय. याला कारण म्हणजे, सुषमा अंधारेंचे पती वैजनाथ वाघमारेंनी शिंदे गटात प्रवेश केलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित ठाण्यातल्या आनंदाश्रमात पालघर, वाडा, कल्याण, भिवंडी मधल्या अनेक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात केला. त्याचवेळी वैजनाथ वाघमारेंनी देखील शिंदेंच्या नेतृत्वात काम तयारी दाखवून राजकीय आखाड्यात उडी घेतलीय.

त्यामुळे सुषमा अंधारेंची कोंडी करण्यासाठी शिंदे गटाकडून वैजनाथ वाघमारेंना स्पेस देण्यात आल्याचा आरोप होऊ लागला आहे.

यानिमिताने राजकारणात एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या व वेगवगळ्या पक्षात असूनही एकत्र राहणाऱ्या दाम्पत्यांची चर्चा सुरु झालीये.

भावना गवळी – प्रशांत सुर्वे

शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे पती प्रशांत सुर्वे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश करत भावना गवळींना आव्हान दिलेलं आहे. ते पायलट म्हणून कार्यरत होते.

भावना गवळी या २०१३ मध्ये आपले पती प्रशांत सुर्वे यांच्यापासून विभक्त झाल्या. त्यानंतर गवळी विरुद्व सुर्वे असा सामना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेला होता.

प्रशांत सुर्वे हे २०१४ सालीच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी उद्धव ठाकरें यांना भेटले होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. सुर्वेंना शिवसेनेत जबाबदारी न मिळाल्यानं त्यांनी थेट पुर्वाश्रमीच्या पत्नीविरोधात लोकसभा लढवली.

अंकिता पाटील – निहार ठाकरे

अंकिता पाटील या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली. त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवत पुणे जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री केली.

हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून अंकिता काँग्रेसच्या कार्यक्रमांपासून दूर राहिल्या. मात्र, त्या भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नातू निहार ठाकरेंसोबत विवाह केला आहे.

शिवसेनेत बंड झाल्यांनतर निहार ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला असून त्यांच्या नेतृत्वात ते राजकीय वाटचाल सुरु करतील, असं बोललं जातंय.

अंकिता पाटील काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्या आहेत., तर निहार ठाकरे बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत आहेत. अंकिता पाटील या पुणे जिल्ह्याच्या राजकारणात जम बसवू पाहतायत. म्हणून त्या अधिकृतरीत्या भाजपमध्ये जातील. त्यामुळे पुढच्या काळातही हे दाम्पत्य वेगवेगळ्या पक्षात दिसेल.

राणी लंके – निलेश लंके

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे पूर्वाश्रमीचे पारनेर शिवसेना तालुका अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी राणी लंके या शिवसेनकडून जिल्हा परिषद सदस्य आहेत. निलेश लंकेनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही त्या शिवसेनेत राहिल्या.

निलेश लंकेची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, राणी लंके औपचारिकता म्हणून शिवसेनेत आहेत.

निर्मला सीतारामन – परकला प्रभाकर

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर हे अर्थतज्ञ असून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र डागत असतात. भारताच्या आर्थिक परिस्थितीवरून ते आपल्या पत्नी निर्मला सीतारामन यांच्यावरही टीका करताना दिसतात.

कोरोनाकाळात त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. ”देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना मृतांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. ही आपातकालीन परिस्थिती आहे. केंद्र सरकारने अशा परिस्थितीत लोकांची मदत करायला हवी. मात्र, केंद्र सरकार हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त आहे; असं ते म्हणाले होते.

तसंच ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना निर्मला सीतारमण यांनी ‘अॅक्ट ऑफ गॉड’ असं म्हटल्यांनंतर निर्मला सीतारामन यांच्यावर पलटवार केला होता. ‘कोव्हिड तर नंतर आला परंतु, आर्थिक आव्हानांचा सामना करता कोणत्याही ठोस धोरणाचा अभाव’ हे यामागचं कारण आहे, असं प्रभाकर म्हणाले होते.

प्रभाकर हे सक्रिय राजकारणापासून दूर असले तरी पत्नी अर्थमंत्री असल्यानं त्यांच्या विधानाच्या चर्चा सगळीकडे असतात. वारंवार ते केंद्र सरकारविरोधात आपलं मत मांडताना दिसतात.

कुठं पती-पत्नी आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय तर कुठं वेगळ्या पक्षात राहून पती-पत्नी एकत्र संसार करताना दिसतात. त्यामुळे राजकारण अनंत शक्यतांचा खेळ आहे, हेच अधोरेखित होतं.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *