जगाला अध्यात्माची भुरळ घालणाऱ्या ओशो यांच्या आश्रमासमोर आर्थिक संकट

पुण्यातील ओशो आश्रमातील काही भाग विकण्याचा घाट
पुणे: कोरोना संसर्गामुळे ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनने पुण्यातील ओशो आश्रमातील भूखंड विकण्याचा निर्णय घेतला आहे. आचार्य रजनीश ‘ओशो’ यांचे देश-विदेशातील अनेक अनुयायी हे आश्रमात ज्ञान आणि अध्यात्माची दीक्षा घेण्यासाठी येत असतात.
पुण्यातील ओशो आश्रमची मालकी झुरिच स्विर्त्झलँड मधील ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनकडे आहे. पुण्यातील आश्रमातील दोन भूखंड उद्योजक आणि बजाज ऑटोचे राजीव बजाज यांना १०७ कोटी रुपयांना विकला जाणार असल्याचे पुढे आले आहे. आश्रमातील भूखंड विक्रीला ओशो फ्रेंड्स फाउंडेशनने तीव्र विरोध केला आहे. भूखंड विक्रीस मनाई करण्यात यावी असा अर्ज ओशो फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयात केला आहे. मुंबई येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात या अर्जावर १५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
‘कोरोना संसर्गामुळे आर्थिक संकट ओढवले आहे. भविष्यात ओशो आश्रमातील ध्यानकेंद्र पुन्हा सुरू करण्यात येईल. मात्र, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी भूखंड विक्री करावी लागत आहे,’ असे ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनने म्हटले आहे. या आश्रमामध्ये मानवी विचार आणि मानसिक शांतीबद्दल अध्यात्मिक मार्गदर्शन दिले जाते. बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील अनेक कलाकार ओशोंचे अनुयायी आहेत.
बजाज यांचा प्रासादतुल्य नावाचा भव्य बंगला ओशो आश्रमाला लागुनच आहे. कोरोना मुळे गेल्या मार्च पासून ओशो आश्रमातील ध्यान केंद्र बंद करण्यात आले होते. या निर्णयामुळे ओशोंच्या विचारांचा प्रभाव असलेल्या युवकांमध्ये नाराजी पसरली आहे.