म्हणून उद्धव ठाकरेंची चिडचिड होते; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरेंवर निशाणा

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली होती. या टीकेला आज सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले.

“भाजपासाठी मतदारांनी अनुकूल व्हावे, यासाठी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नवनवीन उपक्रम राबवत असतात”, अशी उपरोधिक टीका भाजपचे नेते व कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरेंची चिडचिड होत असल्याचेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये संजय राऊत सहभागी झाले होते, यावर देखील मुनगंटीवारांनी भाष्य केलं आहे. “शिवसेनेकडून आम्हाला अपेक्षा होती. पण काही लोकांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या विरुद्धच वागायचं ठरवलं असेल तर काही उपयोग नाही.

ज्या दिवशी काँग्रेससोबत जायचं असेल त्यादिवशी माझं दुकान बंद करेल, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. पण कधी कधी मला वाटतं, मतदारांनी आणि लोकांनी भाजपासाठी अनुकूल व्हावं, म्हणून कदाचित संजय राऊत नवनवीन प्रयोग करत असावे.”, अशी उपरोधिक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मनात खदखद आहे, ती शब्दांच्या माध्यमातून ते चिडचिड व्यक्त करत आहे. सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचे एकही भाषण नाही, ज्यामध्ये त्यांनी राज्यातल्या जनतेसाठी त्यांच्या काळात घेतलेला एखादा निर्णय सांगितला असेल. करोनाच्या धास्तीमुळे मंदिरं बंद ठेवली, पण मद्यालये सुरु केली.

मुंबईत दोन दिवसांचे अधिवेशन व्हायचे, पण नागपूरचे अधिवेशन घेतले नाही. धान देण्यात भ्रष्टाचार होतो, असे सांगत शेतकऱ्यांना बोनस दिला नाही. अशा एक ना अनेक धोरणांमुळे जनतेला फक्त त्रास देण्याचे काम झाले.”,अशी टीका मुनगंटीवार यांनी ठाकरेंवर केली. देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे टोमणे बॉम्ब आहे. टोमणे मारणे हाच माजी मुख्यमंत्र्यांचा पराक्रम आहे. ठाकरेंची भाषा त्यानांच लखलाभ असो, असेही मुनगंटीवार म्हणाले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *