म्हणून साऊ आम्हाला आभाळाएवढ्या वाटतात…

आज १० मार्च स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी!
आयुष्यातील पन्नास वर्षे समाजकार्यात घालवली, नको नको तो अपमान पचवला. या खडतर प्रवासात येणा-या प्रत्येक अडचणींना पायदळी घालून ध्यासपूर्तीसाठी झटत राहिल्या. कर्मठ समाजाच्या विरोधात जाऊन विवाहबंधनात अडकल्यानंतर ही शिक्षण घेणारी सावित्री आजच्या स्त्रीसाठी आदर्श ठरते. आज आपल्या कर्तृत्वाची गगनभरारी घेणा-या कित्येक सावित्रींच्या पंखांना बळ देणारी सावित्री. आजच्या काळातही सावित्रीच्या विचारांनी आणि त्यांच्या शिकवणीने तिच्या लेकी कार्यरत आहेत. मुलीचा गर्भ पोटातच मारणा-या आजच्या काळातील लोकांना सावित्रीचे समर्पण ठाऊक नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नाव उंचावणाऱ्या स्त्रीला सावित्रीबाईंची आठवण झालीच पाहिजे. भारताच्या इतिहासाला एक वेगळे वळण देणारी स्त्री म्हणून ख्याती असणारी सावित्री त्यांनी स्वीकारलेल्या अविरत व्रतामुळे समाजात स्थित्यंतर घडवून आणू शकल्या. वंश, लिंग, धर्म, जात यांच्या आधारावर माणसाचे स्थान ठरविणा-या काळात त्यांनी सर्व बंधने तोडून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला.
‘मुलीने शिकणे म्हणजे धर्माविरुद्ध केले गेलेले कृत्य’ असे मानले गेलेल्या काळामध्ये मुलींना शिक्षणाचे दान देणा-या सावित्री यांनी केवळ चार वर्षात १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. जेंव्हा मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करण्यात आली होती. जेव्हा ब्राह्मण समाजाला समजले की ही शाळा एका शुद्र जोडप्यांनी सुरु केली आहे. तेंव्हा त्यांनी संताप व्यक्त केला.सावित्रीबाई शाळेत जात असताना त्यांच्यावर शेण टाकणे, चिखल फ़ेकणे, अचकट-विचकट भाषेचा वापर करणे,निंदानालस्ती करणे असे अनेक प्रकार सुरु होते.
शैक्षणिक व समाजसुधारणांच्या चळवळीत स्वत:ला वाहून घेताना तत्कालीन समाजातील सनातनी लोक नक्की नामोहराम करण्याचा प्रयत्न करतील याची पूर्वकल्पना असताना त्या कधीही भयग्रस्त व चिंताग्रस्त झाल्या नव्हत्या. काही लोकांनी अंगावर हात टाकण्याची भाषा देखील केली. परंतु सावित्रीबाई फ़ुले या बंडखोर स्वभावाच्या होत्या.अशा अनेक अडचणी आणि संकटांना त्यांनी भीक घातली नाही.कारण जे कार्य त्यांनी हाती घेतले ते भारतातील महिलांसाठी उज्वल भविष्य निर्माण करणारे होते. त्याकाळी स्त्रियांना अजिबातच स्वातंत्र नव्हते. स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे पाप आहे असे समजले जात असे. परंतु हे धाडसी काम फ़ुले दांपत्यांनी सुरु केले.
त्यांनी केवळ स्त्री शिक्षणावरच भर नाही दिला तर अनिष्ट जातीव्यवस्था मोडीत काढून स्त्रियांचे आयुष्य बदलवण्यासाठी प्रयत्न केले. फक्त एक पत्नी म्हणून पतिव्रता बनून राहण्यापेक्षा स्त्रियांना कोणावरही अवलंबून न राहता सक्षम बनवले. आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करायला स्त्रीला कोणी मार्ग दाखविला असेल तर तो सावित्रीबाईंनीच! विधवांचे केशवपन करणाऱ्या न्हाव्यांचा संप पुकारून ही प्रथा कायमची बंद करण्याचे काम महात्मा जोतीराव फुले यांनी केले आणि त्यांच्या सोबतीला होत्या त्या सावित्रीबाई. आज ही प्रथा कायमची बंद होऊन अनेक विधवा महिलांना त्यांच्या मुलांकडून मानसन्माची वागणूक मिळत असते. असल्या अघोरी विचारांची भरपूर खोलवर असलेली पाळेमुळे उखडून फेकण्यात त्यांना यश मिळाले. पुरोगामी विचारांची मोठी शिदोरी जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांनी आपणास दिलेली आहे. बहुजन समाजाला प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. त्यांची शैक्षणिक व सामाजिक चळवळ थांबवण्यासाठी अनेक कुटील डाव खेळले गेले पण सावित्रीबाईंनी कुणालाही दाद दिली नाही.
शैक्षणिक व सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी साहित्य क्षेत्रातही भरीव कामगिरी केल्याचे आपल्याला माहितीच आहे. त्या लेखिका व प्रतिभावंत कवयित्री होत्या. त्यांचे बरेच वाड्मय आजही अप्रकाशित राहिले असण्याची व काळाच्या ओघात गहाळ झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यांच्या साहित्यामुळे वाचकांच्या जीवनकार्यावर अधिक भर पडेल यात शंका नाही. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे जे जे दिसे। ते तेनासे। हे सूत्र या महान लोकमातेलाही लागू पडते.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई आपल्या कार्याच्या रूपाने आजही आपल्यात आहेत. अशा महान थोर महिला भारतात घराघरात जन्माला येवोत. सावित्रीबाईंचे कार्य पाहून, त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी दिलेले योगदान पाहून त्या आम्हा महिलांना आभाळाएवढ्या वाटतात…