… म्हणून मी ‘ते’ ट्विट डिलीट केलं होतं, आदित्य ठाकरेंकडून अखेर खुलासा !

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मोफत लसीकरणावर भाष्य केलं होतं. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचं कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलं होतं. त्यामुळे विरोधकांनी आदित्य यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
आदित्य यांनी ट्विट डिलीट केल्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर टीका केली होती. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करण्याचं ट्विट केलं. ते ऐकून खूप आनंद झाला. पण काही वेळातच त्यांनी ट्विट डिलीट केलं. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय त्यांनी मागे घेऊ नये, असं पडळकर म्हणाले होते.
या सगळ्यानंतर आदित्य यांनी आता ते ट्विट का डिलीट केलं होतं, याचा खुलासा केला आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी नवं ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी डिलीट करण्यात आलेल्या ट्विटवरही भाष्य केलं आहे. तीन दिवसांपूर्वी मी माझं ट्विट डिलीट केलं होतं. कोणताही संभ्रम किंवा गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून मी ट्विट डिलीट केलं होतं. आता मंत्रिमंडळाने मोफत लसीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही बातमी शेअर करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं आदित्य यांनी म्हटलं आहे.
राज्यातील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाच्या संकटातून नागरिकांचं संरक्षण व्हावं म्हणून कर्तव्य म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर ही लसीकरण मोहीम वेगाने पूर्ण करण्यात येईल, असं आदित्य यांनी स्पष्ट केलं आहे.
3 days ago, I had deleted the tweet so as to not create a flutter with it. Now that the policy has been approved by the cabinet, this is the right time to share it formally, ensuring there is clarity and a sense of duty.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 28, 2021