राज्यात लसीचा तुटवडा; केंद्राकडे आरोग्य मंत्र्यांनी केली मोठी मागणी

मुंबई: राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतांना अजून एक संकट समोर आले आहे. राज्यभर लसीचा तुटवडा जाणवत आहे. जर महाराष्ट्रात वेळेत लसीचा पुरवढा झाला नाही तर तीन दिवसात लसीकरण बंद पडण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची ११ राज्याच्या आरोग्यमंत्र्या सोबत आज बैठक पार पडली. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले. सध्या राज्याला १४ लाख डोस लसीचा पुरवठा होत आहे. हा पुरवठा पुढील तीन दिवस पुरेल. म्हणून केंद्र सरकारने दर आठवड्याला ४० लाख कोरोना लसीचा डोस महाराष्ट्राला द्यावेत अशी मागणी टोपे यांनी बैठकीत केली.
राज्यातील अनेक लसीकरण केंद्रावरून लसीचा डोस उपलब्ध नसल्याने नागरिकांना परत पाठविण्यात येत आहे. केंद्र सरकार लसीचा पुरवठा करत नाही असे नाही. पण त्याचा वेग वाढविण्यात यावा. तसेच २० ते ४० वयोगटातल्या जनतेला प्राधान्याने लस द्यायला हवी. अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. यामुळे शेजारील राज्यातून ऑक्सिजचा पुरवठा व्हावा. अशी सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली. तसेच ऑक्सिजन तुटवडा भासल्यास ऑक्सिजनचा वापर करणाऱ्या कंपन्या बंद करण्यात येतील असेही टोपे यांनी सांगितले.