धक्कादायक, कोरोना पॉझिटिव्ह असतानाही शुटींग, गुन्हा दाखल
मुंबई: कोरोना पॉझिटिव्ह असतानाही चित्रीकरण करने मुंबईतील एका अभिनेत्रीच्या चांगलेच अंगलट आले आहे. कोरोना बाधित असतांना घरी न थांबता सार्वजनिक ठिकाणी फिरली. त्याचबरोबर तिने शुटींगमध्ये भाग घेतल्याचे समोर आले आहे. यानंतर तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महापालिकेने त्या अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
राज्यात वाढत जाणारी कोरोना बाधितांची संख्या प्रशासनाची चिंता वाढविणारी आहे. तर काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर पुण्यासारख्या शहरात निर्बंध लावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पॉझिटिव्ह रुग्णावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
अभिनेत्रीवर कारवाई करण्यात आलेल्याची माहिती महापालिकेने ट्वीट करून दिली आहे. त्याच बरोबर कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांना इशारा दिला आहे. “नियम सर्वांसाठी सारखेच कोरोना संदर्भात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अभिनेत्री विरोधात बृहन्मुंबई महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे. मुंबईकरांनो कोरोनाचे नियमाचे काटेकोरपणे नियम पाळा” असा इशारा दिला आहे. हा गुन्हा गौहर खान या अभिनेत्री विरोधात दाखल केल्याची चर्चा आहे.
संबधित अभिनेत्री महापालिका क्षेत्रातील के पश्चिम विभागांतर्गत ओशिवरा परिसरात राहते. महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्याने हा प्रकार समोर आणला आहे. त्यावरून साथरोग नियंत्रण कायद्याखाली तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अभिनेत्रीची ११ मार्च रोजी ची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तिने घरात विलगीकरणात राहणे गरजेचे होते. मात्र त्यानंतर तिने चित्रपटाच्या चित्रीकरण केल्याचे समोर आले होते.