राज्यसरकारला झटका; १०० कोटी वसुलीची होणार चौकशी

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची चौकशी करणार सीबीआय
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. तसेच या आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी केली होती.
परमबीर सिंह यांनी या सर्व प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या याचिकेवर ३१ मार्च रोजी सुनावणी झाली होती. परमबीर सिंह यांची बाजू वकील विक्रम् ननकाणी यांनी मांडली. तसेच जयश्री पाटील यांनी सुद्धा या प्रकरणात याचिका दाखल केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. सीबीआयची चौकशीला मान्यता दिल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का मानण्यात येत आहे.
१५ दिवसात तपास करा
मुंबई उच्च न्यायालयने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निकाल देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआय पुढच्या १५ दिवसात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा आरोपांची चौकशी करणार आहे.